बेळगाव लोकसभा क्षेत्र, बसवकल्याण आणि मस्की विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका राज्यात चर्चेचा विषय बनला असून या निवडणुकीसाठी राज्यातील अनेक इच्छुकांची नावे आपल्याकडे आली आहेत.
या नावांची शिफारस आपण करू. परंतु अंतिम निर्णय हायकमांडकडेच असेल, अशी माहिती केपीसीसी अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी दिली. केपीसीसी कार्यालयात बेळगाव विभागातील नेत्यांसमवेत चर्चा झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
यावेळी ते म्हणाले कि, बेळगाव आणि बसव कल्याण येथील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भागातील नेत्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अभिप्राय घेऊन अनेक सल्लेही घेण्यात आले आहेत.
मी हुबळी येथे जाऊन आल्यानंतर मस्की सह तिन्ही ठिकाणच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची शिफारस दिल्ली येथे करणार आहे. कोणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय मात्र वरिष्ठच घेतील. मी हा निर्णय घेत नाही, केवळ शिफारस करू शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.