धारवाड – बेळगाव रेल्वे मार्गाचे कामकाज अधिक वेगवान होईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हुबळी येथे दिले आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी आपण बातचीत केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे मार्गाचे काम रखडले आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण वचनबद्ध असून, नवीन रेल्वे मार्गाचे काम भूसंपादनासाठी रखडले असल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांना भूसंपादनाविषयी विनंती करण्यासाठी सल्ला देण्यात आला असून हे सर्व प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होतील, अशी खात्री प्रल्हाद जोशींनी दिली.
९७ किलोमीटरच्या या मार्गासाठी ५४५.५५० कोटी रुपयांची आवश्यकता असून या मार्गाचा अंदाजित परतावा ७.०८ टक्के आहे. यासंदर्भात सर्वप्रथम २००३ साली सर्व्हे करण्यात आला होता. सर्व्हे रिपोर्ट रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे २०१२ साली नियोजन आयोगाकडेही पाठविण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
या रेल्वे मार्गदरम्यान १३ स्थानकांचा समावेश असून यात हलगा, गणीकोप्प, तिगूडी, संपगांव, बैलवाडी, बैलहोंगल, नागिनहाळ, हुनशिकट्टी, कित्तूर, तेगुरु, हेगगेरी, मोमिनगट्टी आणि कायराकोप्प या स्थानकांचा समावेश आहे. बेळगाव साठी काराकोप्प येथे जंक्शन बनविण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात कोणती तरतूद करण्यात आली आहे, याकडे पाहावे लागेल, अशी माहिती प्रल्हाद जोशींनी दिली.