कॅंटीनमध्ये चहा पितेवेळी दुसऱ्यासोबत होणाऱ्या भांडणादरम्यान एकाएकी बेळगावच्या खडेबाजार पोलिसांनी दलित युवकावर हल्ला करत अमानुष मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात संबंधित पोलिसांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी दलित नेत्यांनी शहर पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
कॉलेज रोड येथील कॅंटीनमध्ये चहा पिताना इतर समूहामध्ये जोरदार भांडण सुरु होते. याचवेळी याठिकाणी महांतेश नगर येथील सिद्धार्थ चौगुले हा युवक चहा पिण्यासाठी या कॅंटीनमध्ये गेला होता.
अचानकपणे याठिकाणी पोलिसांनी मध्यस्थी करून या भांडणात कोणताही संबंध नसताना सिद्धार्थ याला मारहाण करण्यास सुरुवात केली. सिद्धार्थ चौगुले याला जोरदार आणि अमानुष मारहाण करण्यात आल्याने या प्रकरणातील संबंधित पोलिसांच्या विरोधात कारवाई केली जावी, अशी मागणी डीसीपी विक्रम आमटे यांच्याकडे दलित नेत्यांनी केली आहे.
यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले यांनी माहिती दिली. पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत सिद्धार्थ चौगुले याला दुखापत झाली असून त्याचा उजवा हात देखील फ्रॅक्चर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सिद्धार्थवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात चोर, रियल इस्टेट एजंट अशा लोकांचा सहभाग असून विनाकारण या युवकावर मारहाण करण्यात आलेल्या पोलिसांवर योग्य कारवाई करण्याची मागणी डीसीपी विक्रम आमटे यांच्याकडे करण्यात आली आहे. येत्या २६ जानेवारीच्या आत या पोलिसांवर कारवाई करावी अन्यथा धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मारहाण झालेल्या युवकाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले कि, आपण हॉटेल सन्मानकडे थांबलो असता, अचानक आलेल्या युवकांमध्ये भांडण सुरु झाले. यावेळी आलेल्या पोलिसांनी माझ्यावर लाठीहल्ला केला. पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन मारहाण करण्यात आली. माझा कोणताही सहभाग नसताना मला मारहाण करण्यात आली असून, या प्रकरणातील पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी सिद्धार्थने केली आहे.
डीसीपी विक्रम आमटे यांना निवेदन सादर करताना दलित नेते महादेव तळवार, अर्जुन देमट्टी, आनंद कोलकार, प्रकाश पम्मार, अनिल कांबळे, सागर चौगुले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.