प्रेम प्रकरणातून कथितरित्या पेटवून दिलेल्या विद्यानगर, खानापूर येथील एका महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे कदंबा फाउंडेशनने हेल्प फॉर नीडीच्या मदतीने त्या महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची घटना नुकतीच घडली.
दोन महिन्यांपूर्वी प्रेमप्रकरणातून विद्यानगर, खानापूर येथील एका महिलेला कथितरित्या पेटवून देण्यात आले होते. सदर महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने उपचाराचा फायदा न होता गेल्या सोमवारी तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर नातेवाईकांनी तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
त्यामुळे मृतदेहाचे करायचे काय? हा प्रश्न खानापूर पोलिसांसमोर उपस्थित झाला होता. त्यावेळी खानापूर येथील कदंबा फाऊंडेशनचे संस्थापक जॉर्डन गोन्साल्विस यांनी पुढाकार घेतला. मात्र अंत्यसंस्कार कुठे करायचे हा प्रश्न होता. खानापुरात सरकारी मालकीची खुली जागा शिल्लक नाही. त्यामुळे बेळगावातच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले.
अंत्यसंस्कारासाठी हेल्प फॉर नीडी संघटनेकडे मदत मागण्यात आली. तेंव्हा हेल्थ फॉर नीडीचे संस्थापक प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांनी तात्काळ सहकार्य करण्याची तयारी दाखविली. बेळगाव मध्येही जागेचा प्रश्न उपस्थित झाला होता, परंतु महापालिकेच्या शहापूर येथील जमिनीत अंत्यसंस्कार करण्याचे ठरले.
अखेर जॉर्डन गोन्साल्विस आणि सुरेंद्र अंगोळकर यांनी पंचनाम्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन स्वखर्चाने अंत्यविधी पार पाडला. यापद्धतीने नातेवाईक असून देखील अनाथ झालेल्या एका दुर्दैवी महिलेला मुक्ती दिल्याबद्दल उभयतांची प्रशंसा होत आहे.