कोरोना वॉरियर्सला कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेला बेळगाव जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसून 20 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचे केवळ 65.4 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. या दिवसापर्यंत खरे तर 11,505 जणांना कोरोना लस देणे अपेक्षित असताना केवळ 7,524 जणांना लस देण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यात 16 जानेवारी रोजी प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोरोना वॉरियर्स म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र बऱ्याच कोरोना वॉरियर्सनी लस नाकारल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील जुन्या 10 तालुक्यातील लसीकरणाची आकडेवारी आरोग्य खात्याकडून उपलब्ध झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 84.9 टक्के उद्दिष्ट रामदुर्ग तालुक्यात तर सर्वात कमी म्हणजे 57 टक्के उद्दिष्ट बेळगाव तालुक्यात पूर्ण झाले आहे.
कोरोना लसीकरणाची 20 जानेवारी पर्यंतची तालुकानिहाय आकडेवारी अनुक्रमे तालुका उद्दिष्ट आणि झालेले लसीकरण यानुसार पुढील प्रमाणे आहे. अथणी : उद्दिष्ट 909 -झाले लसीकरण 336, बैलहोंगल : 1606 -1096, बेळगाव : 3098 -1766, चिकोडी : 950 -651, गोकाक : 1739 -1216, हुक्केरी : 597 -384, खानापूर : 649 -383, रायबाग : 1080 -664, रामदुर्ग : 491 -417 आणि सौंदत्ती : उद्दिष्ट 386 -झालेले लसीकरण 311.
पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचे नियोजन आरोग्य खात्याने आधीच केले होते. कोरोना वॉरियर्सची नोंदणी देखील झाली होती. परंतु प्रत्यक्ष लसीकरणावेळी बरेचजण लस घेण्यासाठी आले नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर शरीरावर दुष्परिणाम होतात असा गैरसमज अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. यात भर म्हणून आता आरोग्य कर्मचाऱ्यांनीच लसीकरणास नकार दिला तर मग सर्वसामान्य लोक लस घेतील का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.