कोरोनावरील लसीकरणाचे प्रात्यक्षिक आज शनिवारी बेळगाव जिल्ह्यात तीन ठिकाणी होत आहे. लस बाजारात उपलब्ध झाल्यानंतर कोणत्या पद्धतीने हि लस देण्यात यावी. तसेच यासंदर्भात कोणती खबरदारी घ्यावी यासाठी हे प्रात्यक्षिक बेळगावमध्ये होत आहे.
कोरोना आणि कोरोनावरील लसीसंदर्भात जनतेमध्ये जागृती करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असून बेळगावमधील वंटमुरी प्राथमिक आरोग्य केंद्र (पी.एच.सी.), कित्तूर आणि हुक्केरी येथील इस्पितळ या तीन ठिकाणी लसीकरण प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे.
या प्रात्यक्षिकांसाठी एकूण 25 आशा कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्यांवर हा प्रयोग करण्यात येत असून संबंधित रुग्णालयात रेफ्रिजरेटरसह इतर सर्व आवश्यक व्यवस्था आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आल्या आहेत. आज सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत लसीकरण प्रात्यक्षिक पार पडणार आहे.
देशातील इतर राज्यांप्रमाणेच कर्नाटकातील बेळगाव सह पाच जिल्ह्यांमध्ये आज ही कोरोना लसीची प्रात्यक्षिके होणार आहेत. पहिल्या टप्प्यात लसीकरणासाठी राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची व डॉक्टरांची नोंदणी करण्यात आली आहे. राज्यात अलीकडेच 6.22 लाख जणांनी कोरोनावरील लसीसाठी नोंदणी केली आहे.