बेेेळगाव
बेळगाव शहरातील अनेक प्रभागात सकाळी घंटागाडी कधी येऊन गेली हे कळत नाही. त्यामुळे बेळगाव महापालिकेकडून एक अभिनव उपक्रम राबविला जाणार असून त्याअंतर्गत आता रात्री 7 ते 9 या वेळेत कचरा संकलनासाठी घरोघरी घंटागाडी फिरणार आहे.
सध्या शहरात सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत घंटागाडीद्वारे कचरा संकलन केले जात आहे. तथापि अनेक ठिकाणी लोक लवकर उठत नाहीत. त्यामुळे घंटागाडी कधी येऊन गेली हेच कळत नाही. त्यामुळे अनेक जण घरात साचून राहिलेला कचरा रस्त्याशेजारी. टाकतात. या प्रकारामुळे ब्लॅक स्पॉटची संख्या कमी झालेली नाही.या समस्येवर मात करण्यासाठी रात्रीच्या वेळी घंटागाडी फिरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्या संकल्पनेतून ही योजना आखण्यात आली आहे. अनेक ठिकाणी सकाळी कचरा दिला जात नाही. त्यामुळे कांही ठिकाणी रात्रीच्या वेळी घंटागाडी फिरवण्यात येणार आहे. आयुक्तांनी मंजुरी देताच ही योजना कार्यान्वित केली जाईल, असे डॉ. संजय डुमगोळ यांनी स्पष्ट केले आहे.