बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाचे (सीबीटी) आता हायटेक बसस्थानकात रूपांतर केले जात असून प्रथम राणी चन्नम्मा असे नामकरण करूनच या हायटेक बसस्थानकाचे उद्घाटन केले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आज दिली.
बेळगाव महापालिकेसमोर अनधिकृत लाल-पिवळा ध्वज फडकावून थयथयाट करणारा कन्नड संघटनेचा नेता श्रीनिवास ताळूकर आणि अन्य विविध कन्नड संघटनांच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा आज सत्कार केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना सवदी यांनी उपरोक्त माहिती दिली.
महापालिकेसमोर लाल-पिवळा ध्वज फडकविण्याच्या घटनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, आमच्या भूमीमध्ये आम्ही आमचा कन्नड ध्वज फडकविला यात गैर काहीच नाही. कन्नडला धक्का पोहोचेल अशारितीने वर्तन करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी सूचना आपण जिल्हा प्रशासनाला केली आहे.
बेळगाव महापालिका ही कर्नाटकाच्या भूमीत आहे, तेंव्हा तेथे कन्नड ध्वज फडकला पाहिजे इतर कोणताही नाही. आमच्या भूमीत आमचा ध्वज लावायला आम्हाला इतर कोणाच्या परवानगीची गरज नाही. कन्नड ध्वजाला विरोध करणाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा गैरप्रकार केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले.
कोरोना प्रादुर्भावामुळे बेळगाव बसस्थानकाचे विकास काम पूर्ण होण्यास विलंब झाला आहे. मात्र हे काम येत्या एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याची सूचना मी दिली आहे. यासाठी पुन्हा येत्या 20 जानेवारी रोजी बैठक घेऊन संबंधित कंत्राटदाराला बसस्थानकाचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्यास सांगितले जाईल. अन्यथा तसे झाले नाही तर संबंधित कंत्राटदाराला दंड आकारला जाईल, असे उपमुख्यमंत्री सवदी यांनी सांगितले.