शुक्रवार पासून दहावी आणि बारावीचे वर्ग शाळेमध्ये सुरु करण्यात आले आहेत. कोरोनाच्या सर्व सुरक्षा उपायांसह तब्बल नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर कर्नाटकातील शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळा सुरु करणे अनिवार्य असल्याचे सुचवत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कोविड संदर्भातील सर्व सुरक्षा उपायांचे पालन करण्याचे आवाहन विद्यार्थी आणि शिक्षकांना केले आहे.
शुक्रवारपासून सुरु करण्यात आलेल्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातील शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालयांना भेट देऊन पाहणी केली.
नव्या वर्षाच्या प्रारंभी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित वर्ग सुरु करण्यात आले असून इयत्ता सहावी ते नववी पर्यंतचे विद्यार्थीही कॅम्पस मध्ये आले. परंतु अपेक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांची संख्या मात्र कमी होती.
कोविड चा धोका अजूनही टळला नसल्याने सद्यस्थितीत शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यास अनेकांचा विरोध असूनही शिक्षण खात्याने सर्व खबरदारीच्या उपायांसह हे वर्ग सुरु करण्याचे आदेश दिले.
शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी, तसेच ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह शाळा आणि महाविद्यालये सुरु करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.