बर्ड फ्लूच्या धास्तीने आठवड्याभरात चिकनचे भाव गडगडले असून शहरातील चिकन विक्रीत 30 टक्क्यांनी घट झाली आहे. याखेरीज अंड्यांचा दर देखील शेकडा 400 रुपये इतका घसरला आहे.
कोरोना संक्रमणादरम्यान देशावर बर्ड फ्ल्यूचे संकटही घोंगावताना आणि वाढताना दिसून येत आहे. सध्या कर्नाटकात बर्ड फ्लूचा फैलाव झाला असल्यामुळे त्याचा चिकन व्यवसायावर परिणाम झाला आहे. चिकनचे दर 180 रुपयांवरून 140 रुपये झाले आहेत. अंड्याचा डझनाचा दर 70 ते 75 रुपये होता तो आता 54 रुपये झाला आहे. आरोग्य खात्याने अद्याप बर्ड फ्लू आल्याचे जाहीर केले नसले तरी खवय्यांनी मात्र चिकनकडे पाठ फिरवली आहे.
चिकन विक्रीत घट झाल्याने तसेच दर घसरल्याने याचा फटका विक्रेत्यांना बसत आहे. शहरात विक्री होणाऱ्या चिकन दुकानात 50 कि. मी. आतील कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्या पुरवल्या जात असल्यातरी बर्ड फ्लूच्या धास्तीने चिकन खरेदीवर परिणाम झाला आहे.
दरम्यान, देशात आतापर्यंत आठ राज्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाली आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा व केरळ या राज्यांमध्ये बर्ड फ्लूची प्रकरणे समोर आली आहेत.
बर्ड फ्लूचे प्रकरण देशात सर्वप्रथम 25 डिसेंबर रोजी राजस्थानमधील झालावाडमधून समोर आले आहे. राजस्थानमध्ये आत्तापर्यंत सुमारे 2,950 पक्षांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.