बस आणि कारचा भीषण अपघात; महिला पीएसआयसह चौघांचा जागीच मृत्यू
सौंदत्ती तालुक्यातील चचडी क्रॉसजवळ केएसआरटीसी बस आणि कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. समोरासमोर दोन्ही वाहनांची जोरदार धडक बसली असून अपघातातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सौंदत्ती तालुक्यात ही घटना घडली असून कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात बेळगावच्या महिला पीएसआयसह इतर तिघांचा समावेश आहे.
सह्याद्री नगर येथील महिला पीएसआय लक्ष्मी हणमंतराव नलवडे, प्रसाद पवार, अंकिता प्रसाद पवार आणि दीप अनिल शहापूरकर अशा चौघांचा मृतांमध्ये समावेश आहे. या भीषण अपघातात कारमधील मृतदेहांचा चेंदामेंदा झाला असून हे मृतदेह क्रेनच्या साहाय्याने काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बेळगावहून इलकलच्या दिशेने जाणारी बस आणि यरगट्टी हुन बेळगावला जाणाऱ्या कारमध्ये हा अपघात घडला आहे. मुरगोड पोलीस ठाण्यात प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.