बेळगावच्या लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची वेळ जवळ आली असून भाजपच्या उमेदवाराची घोषणा आश्चर्यकारकरित्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
भाजप हायकमांड, भाजपच्या खऱ्या साध्या कार्यकर्ता उमेदवाराला तिकीट देण्याच्या निर्धारात असल्याची माहिती सूत्रांकडून वर्तविण्यात येत असून भाजपाची नजर आता मराठा वोट बँकेवर असल्याचे निदर्शनास येत आहे. यावेळी बेळगाव लोकसभा निवडणुकीत भाजप कडून उमेदवारी साठी मराठा समाजाचेही उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे हि उमेदवारी मराठा समाजातील एकाला जाहीर झाली तर यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रियपणे कार्यरत असणारे किरण जाधव हेही उमेदवारीच्या शर्यतीत असून यांनाही उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मराठा समाजातून सोनाली सरनोबत आणि उज्वला बडवणाचे यांचेही जम्बो यादीत समाविष्ट आहे.
लोकसभा पोटनिवडणूक आणि उमेदवारी या पार्श्वभूमीवर येत्या १७ जानेवारी रोजी गृहमंत्री अमित शहा हे बेळगाव भेटीसाठी येणार आहेत. यावेळी भाजपचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवारी जाहीर होण्यासंदर्भात भाजपच्या राजकीय गोटात जोरदार चर्चा सुरु असून अमित शहा यांच्या येण्याने कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या उमेदवारी या विषयावरील चर्चेला पूर्णविराम मिळणार असल्याचे भाजपच्या नेत्यांमधून बोलले जात आहे.
दिवंगत सुरेश अंगडी यांच्या समर्थकांकडून अंगडी यांच्या कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी देण्यासाठी मागणी करत आहेत. यासंदर्भात हे समर्थक अमित शहा यांना निवेदनदेखील देणार असल्याचे समजते. रविवारी अमित शहा यांच्या बेळगाव भेटीची माहिती मिळताच भाजपमधील इच्छुकांच्या चर्चेला उधाण आले आहे. आपापल्या परीने अमित शहा यांना भेटून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरु झाली आहे.
सध्या बेळगावात मनपा समोरील अनधिकृत ध्वज चर्चेत आहे या ध्वजा मूळे आगामी निवडणुकात भाजपला बेळगावात फटका बसू नये यासाठी भाजप कडून लॉबिंग सुरू झाली आहे.
दुसऱ्या बाजूला हुबळी येथे काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमधील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या सभेत बेळगाव लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अंतिम करण्याच्या दृष्टिकोनातून नेत्यांचे अभिप्राय घेण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. काँग्रेसमधूनही अनेक इच्छुक लोकसभा पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असून काँग्रेस हायकमांड लवकरच उमेदवारी जाहीर करून शिक्कामोर्तब करणार असल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे.
लोकसभा निवडणुकीची एकंदर पार्श्वभूमी पाहता अद्याप तारीख जाहीर झाली नसूनही इच्छुकांच्या भाऊगर्दीला ऊत आला असून राष्ट्रीय पक्षांच्या वरिष्ठांना इतक्या साऱ्या इच्छुकांमधून एखाद्यालाच उमेदवारी जाहीर करणे अडचणीचे नक्कीच ठरणार आहे. अशातच बेळगावमध्ये बहुलभाग हा मराठी असून मराठी मतांसाठी काँग्रेस आणि भाजपाला जोरदार रस्सीखेच करावी लागणार आहे.