बेेेळगाव शहरातील कपलेश्वर रेल्वे ओव्हर ब्रिज ते जुना पी. बी. रोड रेल्वे गेट दरम्यानच्या रेल्वे मार्गाचा वापर सध्या चक्क दुचाकीस्वारांकडून केला जात असून या धोकादायक प्रकाराला तात्काळ आळा घालण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
कांही अतिउत्साही मंडळींकडून शॉर्टकट म्हणून कपलेश्वर रेल्वे ओव्हर ब्रिज ते जुन्या पी. बी. रोडवरील रेल्वे गेटपर्यंतच्या रेल्वेमार्गाचा वापर दुचाकीवरून ये-जा करण्यासाठी केला जात आहे. कोणीही विचारणारे अथवा अडविणारे नसल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून अत्यंत धोकादायक असा हा प्रकार बिनबोभाट सुरू आहे. कांही जागरूक नागरिक दुस्साहसाचा हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न करत असले तरी दुचाकीस्वारांची मनमानी सुरूच आहे.
एखाद्याने आक्षेप घेतला तर तुम्ही तुमचे काम करा… आम्हाला सांगणारे तुम्ही कोण? असा सवाल करून दुचाकीस्वारांनाकडून उद्धट उत्तरे दिली जातात. शहरातील रहदारीतून वाट काढत जुन्या पी. बी. रोडपर्यंत पोहोचण्यापेक्षा थेट रेल्वे रुळावरुन पी. बी. रोडकडे का जाऊ नये? असा विचार करून मनस्ताप आणि पेट्रोल वाचविण्यासाठी हे अतिउत्साही दुचाकीस्वार आपला जीव धोक्यात घालत आहेत.
सदर रेल्वेमार्गाचा दुचाकीस्वारांकडून सर्रास वापर केला जात असून अचानक जर एखादी सुपरफास्ट रेल्वे आली तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.
तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा धोकादायक प्रकार तात्काळ थांबवावा, अशी मागणी रेल्वे मार्गाच्या दुतर्फा राहणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.