शहरात अन्यत्र कुठेही जलवाहिनीला गळती लागल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते हे सर्वश्रुत आहे. मात्र चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जलवाहिनीला लागलेल्या गळतीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत असून शहर पाणीपुरवठा मंडळाचे हेकेखोर बिनकामाचे उपसंचालक चंद्रप्पा यांची तात्काळ उचलबांगडी केली जावी, अशी मागणी केली जात आहे.
बेळगाव शहर पाणीपुरवठा मंडळाचा गलथान कारभार फक्त शहरातच नाही तर आता चक्क जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पहावयास मिळत आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील एका जलवाहिनीला गेल्या दोन दिवसापासून गळती लागली असून शेकडो लिटर पाणी वाया जात असून याकडे पाणीपुरवठा मंडळाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत.
यापैकी बऱ्याच ठिकाणी या पद्धतीने जलवाहिन्यांना गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र आता ज्या ठिकाणाहून संपूर्ण बेळगाव जिल्ह्याची सूत्रे हलविले जातात त्या जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.
खरेतर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वावर असतो. तेंव्हा किमान या ठिकाणची जलवाहिनीची गळती तात्काळ दुरुस्त करणे अपेक्षित आहे. तथापि बेलगाम पाणीपुरवठा मंडळाच्या गलथान कारभारामुळे गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे मुख्य शासकीय कार्यालया समोरील पाणी गळतीकडे दुर्लक्ष करणारे संबंधित अधिकारी शहरातील सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या जलवाहिन्यांच्या गळतीकडे किती गांभीर्याने पाहत असतील हे लक्षात येते.
आपले बेळगाव शहर स्मार्ट होणार आहे. गेल्या 4 वर्षापासून स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे “स्मार्ट” होत आहेत की “अग्ली” ? हा संशोधनाचा विषय आहे. सेव्ह वॉटर सेव्ह इंडिया अर्थात पाणी वाचवा देश वाचवा, ऊर्जा वाचवा देश वाचवा असे म्हंटले जात असले तरी प्रत्यक्षात बेळगावमध्ये खूद्द पाणी पुरवठा खात्याच्या अधिकार्यांकडून याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत.
सध्या बेळगाव शहरात “कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही” अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील पाणीगळती वरून दिसून येते. जिल्हाधिकारी कार्यालया समोरील जलवाहिनीला लागलेली गळती पाहून येथे दररोज ये-जा करणाऱ्या शेकडो नागरिकांमध्ये सखेद आश्चर्य आणि नापसंती व्यक्त होत आहे. या ठिकाणी वार्तांकनास आलेल्या पत्रकारांनी देखील या प्रकाराचा निषेध करून शहर पाणीपुरवठा मंडळाचे उपसंचालक चंद्रप्पा यांचा बेजबाबदार कारभार याला कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.
बेळगाव सुद्दीचे संपादक मेहबूब मकानदार यांनी तर पाणीपुरवठा मंडळावर कोणाचे नियंत्रण नसल्यामुळे अशाप्रकारे शहरात विविध ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे असे सांगून त्याला संपूर्णपणे या खात्याचे उपसंचालक चंद्रप्पा हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. चंद्रप्पा हे अधिकारी कोणाचे ऐकत नाहीत आणि कामही करत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तेंव्हा चंद्रप्पा यांची तात्काळ उचलबांगडी करावी, अशी मागणी मकानदार यांनी केली आहे. मकानदार यांच्या मताशी सहमत होत त्यांच्या मागणीला उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनी आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1314536675570589/