राज्य सरकारच्या आदेशानुसार नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले असून कोरोना नियमावलीप्रमाणे आज शिक्षक आणि विद्यार्थी कित्येक महिन्यानंतर शालेय आवारात दिसून आले आहेत.
शाळा – महाविद्यालयाचा परिसर गजबजला असून विद्यार्थ्यांची उपस्थितीदेखील अपवाद वगळता उत्साहपूर्ण दिसून आली आहे. विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त उपस्थिती सोमवारपासून वाढण्याची शक्यता शाळा आणि महाविद्यालयांच्यावतीने वर्तविण्यात येत आहे.
फेब्रुवारी महिन्यात अचानक सुटी जाहीर केल्यामुळे शाळा – महाविद्यालयांच्या आवारात शुकशुकाट पसरला होता. गेली २ महिन्यांपासून महाविद्यालयात तुरळक विद्यार्थ्यांची ये – जा दिसून येत होती. परंतु सरकारने दिलेल्या आदेशानंतर आज पुन्हा शाळा आणि महाविद्यालय परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून दहावी आणि बारावी हे दोन शैक्षणिक स्तरातील महत्वाचे टप्पे असल्याकारणानें सध्या हे दोनच वर्ग सुरु करण्यात आले आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यातील समानव्य लक्षात घेऊन पुढील वर्ग सुरु करण्याचा विचार सरकार करणार आहे.
आजपासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश सरकारने जारी केले होते. तत्पूर्वी वर्गखोल्यांची आणि शालेय आवाराची स्वच्छताही करून घेण्याचे आदेश शिक्षण खात्याने बजावले होते. यानुसार सर्व शाळा – महाविद्यालयांचे परिसर सॅनिटायझरची फवारणी करून स्वच्छ करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षण आणि विद्यार्थ्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे. राज्यातील एकूण १६८५० शाळेत आज दहावीचे वर्ग सुरु झाले असून ५७७५ सरकारी शाळा, ११०७५ खाजगी शाळा, १६८५० शालेय शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
५० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या शिक्षकांना फेस शिल्ड वापरणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे एका वर्गात केवळ १५ विद्यार्थ्यांना बसण्यास अनुमती देण्यात आली आहे. राज्यातील काही भागातील शाळांना शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी भेट हि दिली आहे.