बेळगाव विभाग राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद आज पार पडली. या परिषदेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी चर्चा करण्यात आली.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात जारी केलेला कायदा हा शेतकऱ्यांच्या नुकसानीचा ठरणारा आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हे आंदोलन सुरु असून याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे.
भारतात ६० टक्क्याहून अधिक जनता शेतीवर अवलंबून आहे. लाल बहादूर शास्त्रींनीं जय जवान जय किसान चा नारा दिला आहे. परंतु कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा अंमलात आणण्यात येत आहे, हि अत्यंत चुकीचे असून हा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.
याचपद्धतीने घरगुती गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोविड काळात अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. सर्वसामान्य नागरिक सध्या आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात गॅस उपलब्ध करून देण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.
कर्नाटकात १५ जानेवारीपासून शाळा सुरु करण्यासंबंधी सरकारने निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व खबरदारी बाळगावी यासंदर्भात सरकारला निवेदन देण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.
या बैठकीला माजी नगरसेवक मुनीर लतीफ यांच्यासह इतर पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.