महाराष्ट्रात आज ‘महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाप्रश्नी भाष्य केले. तसेच सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी सीमाभागातील नेत्यांमध्ये एकजूट करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या पद्धतीने धग पेटली होती, तीच धग आता बेळगावमध्ये पेट्ने गरजेचे असून तर आणि तरच सीमाप्रश्न मराठी भाषिकांच्या बाजूने सुटेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
अन्याय जाळून टाकणे, हेच शिवसेनेचे काम असून लढ्याची धग निखारा झाली असेल, आणि त्या निखाऱ्यावर राख जमली असेल, तर ती राख बाजूला करून पुन्हा लढा पेटवला, पाहिजे, असेही ते म्हणाले. रहेंगे तो महाराष्ट्रमें नाही तर महाराष्ट्रमेही रहेंगे यासाठी कर्नाटक सरकारचा उर्मटपणा मोडून काढणे अत्यावश्यक आहे. सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असूनही कर्नाटक सरकार कायद्याचा अपमान करत आहे. कर्नाटकातदेखील अनेक कायदेतज्ञ् असतील. त्यांना हि गोष्ट माहित असली पाहिजे. परंतु कायदा डावलून आणि कायद्याचा अपमान करून बेळगावचे नामांतर करण्यात आले, राजधानी म्हणून घोषित करण्यात आले इतकेच नाहीतर विधानसौध निर्माण करून विधिमंडळाचे अधिवेशन भरवण्यात आले. हा न्यायालयाचा अपमान आहे. कायद्याचा विचार कर्नाटक सरकार करत नाही. परंतु आता कर्नाटक सरकारला धडा शिकविण्याची गरज आली आहे.
सीमाप्रश्न हा विषय केवळ थातुर मातुर बोलण्यापुरता नाही. कर्नाटकात कोणत्याही पक्षाचे सरकार असो, कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री असो, परंतु मराठी माणसावरील अन्यायाला महाराष्ट्र सरकारचे दुमत नसेल. कर्नाटकातील मराठी माणसांवर होत असलेल्या अन्याय थांबविण्यासाठी आणि कर्नाटकातील मराठी भूभाग महाराष्ट्रात आणण्यासाठी एकजुटीने भिडलो तरच सीमाप्रश्न सुटेल, असे विधान उद्धव ठाकरेंनी केले.
यावेळी त्यांनी शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या वेषांतराचे संदर्भ दिले. कर्नाटक सरकार नावाप्रमाणेच मराठी माणसांच्या विरोधात बेलगाम वागत आहे. जोवर सर्वोच्च न्यायालयात निकाल लागत नाही, तोवर हा भाग केंद्रशासित करण्यासाठी महाराष्ट्राच्या वतीने खंबीरपणे कोर्टात सांगण्यात यावे. कर्नाटक सरकारची मस्ती अधिक काळ चालू देणार नाही. साक्षी झाल्या, पुरावे झाले. परंतु आता महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकजुटीने हा सीमाप्रश्न सोडवतील, यात शंका नाही. हा प्रश्न हे सरकार सोडवू शकले नाही तर कोणतेच सरकार सोडविणार नाही. परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा पाठिंबा हवा असेल, तर महाराष्ट्र एकीकरण समितीत एकजूट होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले
सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीची एकजूट तुटलीच कशी? असा खडा सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी केला. मराठी माणूस कर्नाटकी अत्याचाराला चिरडून टाकत नाही, याचे कारणच समितीला पडलेली खिंडार असल्याचे त्यांनी सांगितले. समितीत अनेकांनी आपापल्या वेगळ्या चुली मांडल्या आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद हि केवळ समितीची ताकद नसून समस्त मराठी भाषिकांची ताकद आहे. अशी हि समिती राजकीय स्वार्थासाठी उधळण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीला अपशकुन नको म्हणून, केवळ मराठी माणसाची एकजूट कायम राखण्यासाठी शिवसेनेलाही बेळगावमध्ये पाठविले नाही. एवढेच काय तर मार्मिकसुद्धा बेळगावमध्ये पोहोचू दिले नाही. परंतु सध्या महाराष्ट्र एकीकरण समितीला पडलेली खिंडार हि चिंतनीय बाब असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.
एकेकाळी सीमाभागात ५ आमदार निवडून यायचे. तो काळ सोन्यासारखा होता. लढ्याचा काळ होता. त्या लढ्यालाही सोन्याची झालर होती. मराठी माणूस मराठी माणसाच्या पाठीशी उभा होता. परंतु आज आपणच आपल्या हाताने पायावर धोंडा पडून घेतला. सर्वच विस्कळीत झाले. पिढ्या पुढे सरकल्या मात्र लढा अजूनही तिथंच आहे. इंदिरा गांधी आणि सरसेनापती बापट यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा देत पिढ्यानपिढ्या सुरु असलेला लढा कालबाह्य होऊ नये, याकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्यासाठी सल्ला दिला. याआधी जे काही झाले, अनुभवाचे चटके, अनुभवाचे फटके हे काही कमी पडले नाहीत. मराठी अस्मिता, मराठी ताकद आता जमविण्याची आणि दाखवण्याची वेळ आली आहे. आपल्या भाषणात ठाकरेंनी कोल्हापूर येथील महासभेचा देखील संदर्भ सांगितला. सीमाभागातील तरुणांनी त्यावेळी ठाकरेंकडे अन्यायातून मुक्त करण्यासाठी केलेली याचना त्यांनी आठवण करून दिली.
सीमाप्रश्नासंदर्भात अनेक पुस्तके प्रकाशित झाली. परंतु दुर्दैवाने ती आता उपलब्ध नाहीत. आणि जी उपलब्ध आहेत, त्यांचे सरकारच्यावतीने पुनर्मुद्रण करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यासह हा लढा जगभर पोहोचण्यासाठी आणि कर्नाटकी सरकारचा अन्याय संपूर्ण जगाला माहित होण्यासाठी ‘महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचा अनुवाद करून हे पुस्तक नेटवर अपलोड करण्यासाठीही त्यांनी सांगितले. कर्नाटकी अत्याचार आणि मराठी माणूस यावर अशी पुस्तकेच नाही तर चित्रपटदेखील प्रदर्शित करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. आमचा कानडीला विरोध नाही. कानडीचा दुःस्वास नाही. परंतु कानडी अत्याचाराला मात्र आपला विरोध असल्याचे त्यांनी जाहीर केले.
हे सरकार हा सीमाप्रश्न सोडवणार म्हणजे सोडवणारच आणि कोर्टात लढाईही जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता कालबाह्य नाही तर कालबद्ध कार्यक्रम सुरु करू. बेळगावमध्ये पुन्हा मराठी आमदार, महापौर निवडून आलेले मला पाहायचे आहेत. सर्व मतभेद गाढून टाका. नव्या तेजाने, नव्या दमाने, नव्या जिद्दीने पेटून उठा, एकजूट करा, आणि जोपर्यंत हा भाग महाराष्ट्रात येत नाही तोवर आपण शांत बसणार नाही, अशी प्रतिज्ञा करा, शपथ घ्या आणि पाऊल पुढे टाका, धीराने गांभीर्याने आपण हा लढा नक्कीच जिंकू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला.