बेळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने लक्ष घालावे, आणि सीमाभागातील मराठी अस्मितेचा मानबिंदू असणाऱ्या मनपावर मराठी भाषिकांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी सीमासमन्वयक एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना, बेळगावच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत सीमाभागातील मराठी भाषिकांची सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीने मार्गदर्शन करावे. महाराष्ट्राचे पालकमंत्री झाल्यानंतर बेळगावला एकनाथ शिंदे यांनी एकदाही भेट दिली नाही.
यासाठी निवडणूक काळात एकनाथ शिंदे यांनी सीमाभागात तळ ठोकून सिमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. बेळगावमधील महानगरपालिका आजतागायत मराठी माणसांच्याच हाती आहे. परंतु यंदाची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे महाराष्ट्राने आगामी मनपा निवडणुकीत सीमावासियांच्या पाठीशी उभे राहून मार्गदर्शन करावे, अशीही मागणी करण्यात आली.
त्याचप्रमाणे केवळ पाठिंबा न देता सीमाभागातील मराठी जनतेला कोणत्या प्रकारे सीमाभागात वर्चस्व टिकवून ठेवावे, यासाठी आदेश द्यावे, त्या आदेशाचे मराठी जनता नक्कीच पालन करेल, असा विश्वास शिष्टमंडळाच्यावतीने देण्यात आला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, बेळगावमधील मराठी जनतेच्या हक्कांची पायमल्ली होत आहे. माणूस म्हणून संविधानाने दिलेले अधिकार हिरावून घेतले जात आहेत. संविधानाची पायमल्ली कर्नाटक सरकार सातत्याने करत आहे. मनपासमोर फडकविण्यात आलेला लाल-पिवळा अनधिकृत असल्याचे सांगूनही, याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. आणि याला विरोध करणाऱ्या मराठी भाषिकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा सुरु झाला आहे.
यामुळे महाराष्ट्राने समन्वय साधून सीमाप्रश्नी जोवर हायकोर्ट निकाल देत नाही, तोवर परिस्थिती जैसे थे ठेवण्याची सूचना कर्नाटक सरकारने करावी, असा सल्ला शुभम शेळके यांनी दिला. सीमाभागात मराठी माणसावर करण्यात येणारी दडपशाही रोखावी, आणि सीमाभागातील मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा, तसेच सीमाप्रश्नी भिजत घोंगडे ठेवण्यात आले आहे, यासंदर्भात महाराष्ट्राने खंबीर पाठपुरावा करण्याची विनंती शुभम शेळके यांनी केली.