आरोग्य विभाग आणि बीम्सची प्रगती आढावा बैठक
जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्याची आरोग्यमंत्र्यांनी केली सूचना
जनतेला परवडणारी आणि विनामूल्य आरोग्य सेवा पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. यासंदर्भातील सरकारच्या अनेक योजना आहेत, त्या अंमलात आणून जनतेपर्यंत सर्व सोयी सुविधा पोहोचवाव्यात अशा सूचना आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांनी दिल्या.
आज जिल्हाधिकारी सभागृहात आरोग्य विभाग आणि बीम्सची प्रगती आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग विलीन करून एकत्रितपणे कार्य करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. एनबीएच आणि एनक्यूएएस ची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्वरित कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कोरोना प्रतिबंधक अशा ‘कोव्हीशिल्ड’ या लसीच्या वितरणाला शनिवारी प्रारंभ करण्यात आला असून जिल्ह्यात विविध ठिकाणी हे लसीकरण करण्यात आले आहे. बीम्स आणि केएलई संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार याआधी निश्चित केलेल्या आरोग्य कर्मचार्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. या लसीकरण मोहिमेचा आढावा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी घेतला. लसीकरणाच्या संदर्भातील विविध मुद्द्यांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची कामे लांबणीवर पडत आहेत, यासंदर्भात मंत्री सुधाकर यांनी कंत्राटदारांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना लसीकरणासंदर्भात आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले.
या बैठकीला आरोग्य विभागाचे संचालक ओमप्रकाश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी दर्शन एच. व्ही. अपर निर्देशक डॉ. आप्पासाब नरट्टी, अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, अपर जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याणाधिकारी डॉ. तुक्कार यांच्यासह बीम्सचे वरिष्ठ अधिकारी, तालुका आरोग्याधिकारी उपस्थित होते.