बेळगाव वनखात्याच्या पोलीसांनी सापळा रचून महाराष्ट्र राज्यातील एका ठिकाणी मांडूळ या दुतोंडी सापाची तस्करी करत असलेल्या तिघाजणांना रंगेहात पकडून त्यांच्याकडील दोन जिवंत साप जप्त केल्याची घटना अथणी तालुक्यातील तेलसंग गावाच्या क्रॉसनजीक शनिवारी रात्री घडली. या कारवाईप्रसंगी अन्य 3 आरोपी फरारी झाले आहेत.
अक्षय गुरु कोट्याळ (वय 25, रा. जोरापुर पाण्याच्या टाकीनजीक, विजयपुरा) अक्षय गुरप्पा लाळसंगी (वय 19, रा. विद्यानगर, सिंदगी) आणि दुंडप्पा आयप्पा बागायत (वय 40, रा. केएचपी कॉलनी, आदर्शनगर, विजयपुरा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नांवे आहेत.
बेळगाव वनखात्याच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उपरोक्त कारवाई केली. तिघाही आरोपींवर महाराष्ट्रात दोन जिवंत साप विकल्याचा आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आरोपींकडून प्रत्येकी अंदाजे 1 किलो वजनाचे 2 जिवंत दुतोंडी साप आणि बॅटरी जप्त करण्यात आली आहे.
तेलसंग क्रॉसनजीकच्या कारवाईप्रसंगी अन्य तीन आरोपी फरारी झाले आहेत. पोलीस चौकशीत फरारी आरोपींची नांवे शिवू मल्लाप्पा कमलाकर (वय 24, रा. विद्यानगर, सिंदगी), शंकर काशिनाथ लोनी ( रा. कुंभार गल्ली, विजयपूर आणि अब्दुलबाशा (रा. गुलबर्गा) अशी असल्याचे उघड झाले आहे. या तिघांचा वन अधिकाऱ्यांकडून शोध घेतला जात आहे. अटक केलेल्या आरोपींच्या विरोधात अथणी वनविभाग कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
तस्करी करण्यात येणाऱ्या या सापांना दुतोंडी मालन किंवा मांडूळ म्हटले जाते. दुतोंडी सापाला वैज्ञानिक भाषेत रेड सॅंड बोवा स्नेक असे म्हंटले जाते. या सापाची शेपटी ही तोंडा सारखी दिसते या सापाच्या बाबतीत अनेक भागात वेगवेगळ्या रूढी अंधश्रद्धा आणि गैरसमजुती पसरलेल्या असल्याने आंतरराष्ट्रीयस्तरावर यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या मांडूळची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. शक्तिवर्धक आणि गुप्त धन मिळवण्याच्या अंधश्रद्धेमुळे या मांडूळांना बरीच मागणी असते. एका मांडूळाची किंमत साडे तीन लाखापर्यंत असते. अत्यंत दुर्मिळ जातीच्या मांडूळ सापाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखांपासून 25 कोटीच्या घरात किंमत असते.
इतकी मोठी किंमत मिळत असल्याने अनेक जण या सापांच्या या तस्करीत गुंतले आहेत. भारतीय वन्य जीव संरक्षण कायदा 1972 नुसार या दुतोंडी सापाला विशेष प्राण्यांच्या गटात स्थान दिले आहे. तसेच याची तस्करी करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. सापांच्या तस्करीमध्ये बऱ्याच वेळा सर्पमित्र देखील सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे.