कोरोना प्रादुर्भावामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशावरून गेल्या या सुमारे 10 महिन्यांपासून बंद असलेले न्यायालयाचे प्रत्यक्ष कामकाज मार्गदर्शक सूचीचे पालन करत आज अखेर पूर्ववत सुरू झाले आहे. त्यामुळे आज बेळगाव न्यायालय आवार पक्षकार आणि वकिलांच्या गर्दीने फुललेले पहावयास मिळाले.
कोरोना प्रादुर्भावाची वाढत्या तीव्रतेचा धोका लक्षात घेऊन गेल्या सुमारे दहा महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व न्यायालय बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र अल्पावधीनंतर महत्त्वाच्या खटल्यांचे कामकाज ऑनलाइन सुरु ठेवण्यात आले होते. त्यानंतर कोरोना प्रादुर्भाव कमी होताच मार्गदर्शक सूचीचे पालन करून गर्दी न करता मर्यादित मंडळींच्या उपस्थितीत न्यायालयीन काम सुरू झाले होते. यावेळी वकिलांना त्यांचा काळा कोट घालण्यास मनाई होती.
त्यामुळे वकीलवर्ग फक्त गळ्यावरील वकिली बँड लावून कामकाजात सहभागी होत होता. मात्र आता कोरोनाचे संकट निवळल्यामुळे न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून बेळगावातील न्यायालयं पूर्ववत सुरू झाली आहेत.
न्यायालयीन कामकाजाला आजपासून पूर्ववत प्रारंभ झाला असला तरी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन केले जात आहे. न्यायालयं तब्बल दहा महिन्यानंतर पूर्ववत खुली झाल्यामुळे आज बेळगाव न्यायालय आवारात पक्षकार आणि वकिलांची पूर्वीप्रमाणे गर्दी पहावयास मिळाली. त्याप्रमाणे वकील मंडळी फक्त गळ्याचा बँड न लावता आपला नेहमीचा काळा कोट घालून आपल्या पूर्ण पोषाखात उत्साहाने न्यायालयीन कामकाजात सहभागी झालेली दिसत होती.
न्यायालयाची मुख्य प्रवेशद्वारे आज सर्वांसाठी खुली करण्यात आली होती. तथापि गेटवर प्रत्येकाचे टेंपरेचर स्क्रीनिंग केले जात होते. तसेच पूर्वीप्रमाणेच मात्र सोशल डिस्टंसिंगसह मास्कचा वापर करून न्यायालयीन कामकाज सुरू होते. न्यायालयात पूर्ववत सुरू झाल्यामुळे पक्षकार आणि वकीलवर्गामध्ये समाधान व्यक्त होताना दिसत होते.
कोरोना आणि लॉक डाऊनमुळे अनेक खटले प्रलंबित असल्यामुळे वकिलांसह न्यायालयीन कामकाजाशी संबंधित सर्वच मंडळी आज जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत होते.