येत्या १७ जानेवारी रोजी अमित शहा बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. याचदिवशी हुतात्मा दिन आहे. यानिमित्ताने सीमाभागातील मराठी जनतेची एकी दाखविण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे सर्व गट – तट आणि राजकारण बाजूला सारून एकजुटीने मराठी जनतेने ताकद दाखविणे आवश्यक असल्याचे विचार आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
रामलिंग खिंड गल्ली येथील मराठा समाजाचे जातीमठ देवस्थान येथे महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत मनपासमोर काही तथाकथित कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी फडकविलेल्या लाल-पिवळ्यासंदर्भात निषेध व्यक्त करण्यात आला असून हा लाल पिवळा मनपासमोरून त्वरित हटविण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.
महानगरपालिकेवर आजतागायत भगवा झेंडा फडकविण्यात येत होता. परंतु मनपा इमारत स्थलांतर करतेवेळी जाणूनबुजून भगवा ध्वज हटविण्यात आला होता. सीमाभागात प्रत्येक गोष्टीसाठी मराठी भाषिकांवर अन्याय होत असून, दडपशाहीचे तंत्र प्रशासन अवलंबत आहे. या साऱ्या गोष्टींचा विचार करून सर्व हेवेदावे बाजूला सारून सर्व नेत्यांनी जनतेसहित आपली ताकद दाखविण्याची वेळ आली असल्याचे मत अनेकांनी या बैठकीत व्यक्त केले.
येत्या १७ जानेवारी रोजी होणारा हुतात्मा दिन गांभीर्याने पाळावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. योगायोगाने यादिवशी अमित शाहदेखील बेळगावमध्ये येणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सीमावासीयांवर करत असलेल्या अन्यायाची जाणीव केंद्रापर्यंत पोहोचविण्याची नामी संधी असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. अमित शहा यांच्याकडे मोठ्यासंख्येने एकत्रित येऊन सर्वांनी सीमाभागातील परिस्थितीची जाणीव करून देण्याची गरज असल्याचेही या बैठकीत विचार व्यक्त करण्यात आले.
गेली ६४ वर्षे न्यायप्रलंबित असणाऱ्या सीमाप्रश्नी भिजत घोंगडे आहे. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आहे. मराठी भाषिकांचे प्रश्न आणि त्यांच्या व्यथा या महाविकास आघाडी सरकारला चांगल्याच ज्ञात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने भक्कम बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडावी, यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे मतही या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
या बैठकीला नेताजी जाधव, किरण गावडे, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर, माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर, सुहास किल्लेकर, संजय मोरे, नारायण कीटवाडकर, अजित कोकणे आदींसह इतर नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.