जुने बेळगाव येथील वैद्यकीय कचरा प्रकल्पाला टाळे ठोकण्यात आले असले तरी आता थीम पार्कच्या योजनेमुळे लवकरच या संपूर्ण प्रकल्पाला आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे. याला मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनीही दुजोरा दिला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून जुने बेळगाव येथे वैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्प सुरू आहे. असोसिएशन ऑफ मेडिकल एस्टॅब्लिशमेंटकडून हा प्रकल्प राबविला जात असला तरी कचऱ्याचे प्रमाण अधिक आणि यंत्रणा कमी अशा अवस्थेमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे.
यासंदर्भात स्थानिक नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारी आणि नोटीस बजावून देखील दखल घेण्यात न आल्यामुळे महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकल्पाला नुकतेच टाळे ठोकले आहे.
जुने बेळगाव परिसरात थीम पार्क उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. वैद्यकीय कचरा प्रकल्प पुन्हा सुरू झाला तरी तो फार काळ चालणार नाही. आता थीम पार्क उभारणीला मंजुरी मिळाल्यामुळे कचरा प्रकल्पाला तिथून गाशा गुंडाळावा लागणार आहे. याबाबत महापालिकेने प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या थीम पार्कमुळे प्रकल्प अन्यत्र न्यावा लागणार आहे, अन्यथा तो पाडण्याची तयारी देखील महापालिकेने केली आहे. त्यामुळे असोसिएशन ऑफ मेडिकल एस्टॅब्लिशमेंटकडून कित्तूर परिसरात या प्रकल्पासाठी जागेचा शोध सुरू झाला आहे.