कुंदानगर म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या बेळगावच्या राजकीय पटलावर एक नवा चेहरा उदयास येत आहे. दिवंगत सुरेश अंगडी यांच्या उत्तराधिकारी म्हणून श्रद्धा शेट्टर यांचे नांव निश्चित झाल्याची शक्यता आहे.
श्रद्धा शेट्टर यांना राजकीय आखाड्यामध्ये उतरविण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. कै. सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला आणि ज्येष्ठ कन्या स्फूर्ती अंगडी यांना राजकारणात विशेष रस नसल्यामुळे श्रद्धा शेट्टर यांना लोकसभा पोटनिवडणुकीतचे तिकीट दिले जावे अशी विनंती त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींनी केली आहे. या कारणासाठी गेल्या एक महिन्यापासून श्रद्धा शेट्टर बेळगाव लोकसभा मतदार संघात सक्रिय झाल्याचे पहावयास मिळत आहे.
भाजप नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे. तसेच भाजपच्या सभा -समारंभामध्ये सहभागी होण्यामध्ये श्रद्धा शेट्टर व्यस्त असल्याचे दिसत आहे. नुकतीच त्यांनी बेळगाव ग्रामीण मतदार संघातील येळ्ळूर राजहंस गडाला भेट देऊन गडावरील मंदिरात पूजा केली, तसेच ग्रामस्थांची भेट घेऊन विचारपूस केली.
श्रद्धा शेट्टर या कांही दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या फक्त कन्या नाहीत तर मंत्री जगदीश शेट्टर यांच्या स्नुषा देखील आहेत. आता आपल्या सुनेला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे तिकीट मिळवून देण्यासाठी मंत्री जगदीश शेट्टर यांनी कंबर कसली आहे.
जगदीश शेट्टर यांच्या समवेत जिल्हा पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांची देखील श्रद्धा शेट्टर यांना तिकीट मिळावे अशी इच्छा आहे. यापद्धतीने श्रद्धा शेट्टर यांचा राजकीय प्रवेश आता फायनल अर्थात निश्चित झाला असून लवकरच उमेदवारी देखील अंतिम होईल अशी शक्यता आहे.