मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्यावतीने येत्या दि. 4 फेब्रुवारी पासून लष्कर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याकरिता आत्तापर्यंत 14,000 हून अधिक युवकांनी ऑनलाइन अर्ज केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र या लष्कर भरतीसाठी कोरोना चांचणी सक्तीची करण्यात आल्याने इच्छुक गरीब युवकांचा आर्थिक भुर्दंड वाढला आहे.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्यावतीने व्ही. टी. यू. परिसरात येत्या चार फेब्रुवारीपासून लष्कर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. खुल्या भरतीसाठी 14000 हून अधिक युवकाने ऑनलाइनद्वारे अर्ज केले आहेत. मात्र भरतीवेळी येताना 48 तासांच्या आतील कोरोना चांचणीचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे लष्कर भरतीसाठी येणाऱ्या अर्जदारांनी कोरोना चांचणी करून घेण्यासाठी चौकशी चालविली आहे. जिल्हा रुग्णालय आणि सरकारी प्राथमिक केंद्रात कोरोना चांचणीबाबत अर्जदाराने विचारणा केली असता खाजगी रुग्णालयात तपासणी करून घेण्याची सूचना करण्यात येत आहे.
कोरोना चांचणी करता खासगी रुग्णालयात 3.5 ते 4 हजार रुपयांची आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना चांचणीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्जदारांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कारण कोरोना चांचणी केल्यानंतर निवड होईलच असेही सांगता येत नाही. लष्कर भरती करिता महाराष्ट्र व कर्नाटकसह विविध राज्यातील युवक बेळगावात दाखल होत असतात. यापैकी बऱ्याच जणांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. त्यामुळे अशा परिस्थितीत कोरोना चांचणीची सक्ती केल्याने संबंधित युवक आणि त्याच्या कुटुंबीयांची आर्थिक ओढाताण होणार आहे. भरती करता येणाऱ्या युवकांची थर्मल स्क्रीनिंग आणि ऑक्सीमीटरने तपासणी करून त्यांना भरतीवेळी प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
येत्या 4 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या लष्कर भरती प्रक्रियेत 14,000 होऊन अधिक किंवा सहभागी होणार असल्याने या सर्वांनाच ठराविक वेळेत कोरोना चांचणीचे प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा आणि युवकांवरील आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी आवश्यक तोडगा काढला जावा किंवा आरोग्य खात्याने भरतीसाठी जाणाऱ्या युवकांसाठी कोरोना चांचणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी देखील होत आहे.