बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना यापुढे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारी सुरक्षा उपकरणे दुकानात बसविण्याची सक्ती करण्यात आली असून पोलिसांनी तशी नोटीस बजावली आहे.
कर्नाटक नागरिक सुरक्षा कायदा 2017 अंतर्गत आता व्यापाऱ्यांना नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असणारी सुरक्षा उपकरणे बसवावी लागणार आहेत. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांमध्ये 24 तास छायाचित्रे संग्रहित करणारा सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा. सुरक्षितता नियमांतर्गत सूचित केलेला कॅमेरा दुकानात बसवला जावा. सलग 30 दिवस छायाचित्र संग्रह करण्याची क्षमता त्यामध्ये हवी. दुकानांमध्ये सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात यावी आणि याची माहिती देण्यात यावी.
व्यापारी आस्थापनाचा नकाशा, सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आलेली जागा, आपत्कालीन प्रसंगी बाहेर पडण्याचे ठिकाण या संदर्भातील माहिती देण्यात यावी. व्यापारी आस्थापनांना भेट देणाऱ्या नागरिकांची आणि वाहनांची तपासणी करण्यासाठी आवश्यक उपकरणांची व्यवस्था असावी. अग्निशमन उपकरणे बसविण्यात यावीत, अशी सूचना नोटीसद्वारे देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे येत्या तीन दिवसात याबाबत माहिती न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.