नव्या होलसेल भाजी मार्केट येथील चहावाल्यांच्या चहाच्या लहान-लहान टपऱ्या एपीएमसी कर्मचाऱ्यांनी काल रातोरात उखडून टाकल्यामुळे संबंधित विक्रेते उघड्यावर पडले असून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एपीएमसी येथील नव्या होलसेल भाजी मार्केट येथे गरीब चहा व अल्पोपहार विक्रेत्यांच्या तीन -चार चहाच्या टपर्या होत्या. या टपर्यामुळे संबंधित विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. गेल्या दोन-तीन दिवसापासून सदर चहाच्या टपऱ्या हटविण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र टपरी मालकांची एपीएमसी अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर सर्व कांही शांत झाले असताना काल शुक्रवारी रात्री अचानक बुलडोझर लावून चहाच्या टपऱ्या उखडून टाकण्यात आल्या. तत्पूर्वी जबरदस्तीने संबंधित चहाच्या टपर्यांमधील साहित्य बाहेर काढण्यात आले.
कोणतीही पूर्वसूचना न देता अथवा पर्यायी जागा उपलब्ध करून न देता चहाच्या टपर्या उखडून टाकण्यात आल्यामुळे गरीब टपरी मालक रस्त्यावर आले असून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी एक जण रस्त्यावर पिशव्या आणि पोती विकण्याचा व्यवसाय करत होता.
त्याला एपीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी तुझे दुकान तात्काळ हलव अन्यथा पिशव्या आणि पोती पेटवून देऊ असे धमकावले. त्यामुळे घाबरून या पिशवी विक्रेत्याने तात्काळ सर्व पोती व पिशव्या एकत्र करून तिथून काढता पाय घेतला. दरम्यान, या पद्धतीने गरीब चहा विक्रेत्यांच्या पोटावर पाय आणल्यामुळे भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये हे तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.