Wednesday, November 20, 2024

/

गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍यासाठी व्यापक पोलीस बंदोबस्त

 belgaum

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवार दि. 17 जानेवारी रोजी बेळगाव दौऱ्यावर येत असल्यामुळे व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. यासाठी पोलीस प्रमुख दर्जाच्या तब्बल 15 अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.

रविवारी जिल्हा क्रीडांगणावर होणाऱ्या जनसेवक मेळाव्याच्या समारोप समारंभास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिस कुमक मागविण्यात आली असून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी बंदोबस्तास संदर्भात दिलेल्या माहितीनुसार विविध जिल्ह्यातून 15 जिल्हा पोलीस प्रमुख, 53 उपजिल्हा पोलीस प्रमुख, 118 सीपीआय, 235 पीएसआय, 350 एएसआय, 2380 हवालदार आणि पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे राज्य राखीव पोलीस दल, एसआयएसएफच्या 16 आणि एएसएच्या 10 तुकड्या मागविण्यात आल्या आहेत. सीआरपीएफ, एफपीबी, बीडीडीएस आणि सीआयडी गुप्तचर विभागाच्या अधिकारांना देखील बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बेळगाव दौऱ्याच्या बंदोबस्तासाठी यापूर्वी बेळगावच्या पोलीस आयुक्त असलेल्या सीमा लाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वतः राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सुरू यांनी अमित शहा यांच्या बेळगाव दौऱ्याच्या बंदोबस्तासाठी सीमा लाटकर यांची नियुक्ती केली आहे. सीमा लाटकर यांनी बेळगावच्या कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त म्हणून उत्तम सेवा बजावली आहे. बेळगाव येथील त्यांचा अनुभव लक्षात घेऊन राज्य पोलीस महासंचालकांनी या महत्त्वाच्या बंदोबस्तासाठी त्यांची नियुक्ती केली आहे. बंदोबस्तासाठी ते स्वतः अतिरिक्त अधिकारी असणार आहेत. त्याचप्रमाणे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक प्रताप रेड्डी यांच्यासह राज्यातील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बंदोबस्तावर नजर असणार आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून राणी चन्नम्मा सर्कलपासून कोल्हापूर सर्कलकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. याबरोबरच संगोळी रायण्णा सर्कल जुना पी. बी. रोड (मराठा मंडळ जवळ), मराठा मंडळ ते माहेश्वरी शाळेला जाणारा क्रॉस रोड, गंगवाडी सर्कलपासून हॉटेल रामदेव कडे जाणारा रस्ता, शिवबसवनगर येथील केपीटीसीएल कल्याण मंडप ते एस. जी. बाळेकुंद्री इंजिनिअरिंग कॉलेज मार्गे होणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. शिवबसवनगर क्रॉसपासून डेंटलकडे जाणारा मार्ग, हिंडाल्को अंडर ब्रिज सर्विस रस्त्यापासून केएलईकडे येणारा मार्ग, बॉक्साईट रोडपासून शिवालयकडे जाणारा मार्ग, नेहरूनगर (एपीएमसी रोड) आणि नेहरूनगर दुसऱ्या क्रॉसवरून केएलईकडे जाणारा मार्ग, लक्ष्मी कॉम्प्लेक्सपासून बाटा शोरूम व सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणारी वाहतुक रविवारी अडविण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. त्याच प्रमाणे रविवारी सकाळी 7 ते जाहीर सभेच्या समारोपापर्यंत विविध मार्गावरील वाहतुकीत करण्यात आलेला बदल लक्षात घेऊन नागरिकांनी पोलिसांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.