बेळगावमध्ये १७ जानेवारी रोजी भाजपच्यावतीने भव्य सभा घेण्यात येणार आहे. या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती असणार आहे. एक लाखाहून अधिक जनता या सभेत सहभागी होणार असून मुख्यमंत्री येडियुरप्पा, भाजप राज्यध्यक्ष नलिनकुमार कटील, खासदार, आमदार यासह इतर लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती राज्याचे प्रधान कार्यदर्शी आणि विधान परिषदेचे सदसर एन. रवीकुमार आणि राज्य आहार आणि नागरी पुरवठा मंत्री के. गोपालय्या यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
११ जानेवारी रोजी राज्यातील सर्व केंद्रामध्ये गोपूजा आणि ग्राम पंचायत सदस्यांचे अभिनंदन करण्यात येणार असून जनसेवक समावेश कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात येणार आहे. तालुका पंचायत, जिल्हा पंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी हि महत्वाची पायरी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पक्षाचे राज्याध्यक्ष आणि खासदार नलिनकुमार कटील,पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वरप्पा, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, औद्योगिक मंत्री जगदीश शेट्टर, उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथनारायण यांच्या नेतृत्वाखालील पाच पथके राज्यस्तरावर जनसेवक समावेश कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात ११ ते १३ जानेवारी पर्यंत होणार असून दररोज १० जिल्ह्यात हा कार्यक्रम आखण्यात येणार आहे. पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.