मुंबई येथे डॉनगिरी करून नंतर बेळगावात आलेल्या आणि सध्या शिवाजीनगर येथे असलेल्या एका स्वप्निल उर्फ डॉन याने क्षुल्लक कारणावरून तरुणावर चाकूहल्ला केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला आहे. यासंबंधी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली असून याबाबत उलटसुलट चर्चा करण्यात येत आहे.
गौरव प्रदीप नेसरीकर वय बावीस राहणार शिवाजीनगर असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याच परिसरात स्वप्निल उर्फ डॉन हा फिरत असतो. सध्या शिवाजीनगर येथे राहत आहे. रविवारी रात्री गौरव शिवाजी नगर तिसरा कळस येथे मेडिकल दुकानाकडे जात असताना त्याने हा हल्ला केला आहे.
गौरवला अडवून स्वप्निलने त्याच्याशी भांडण काढले. त्यानंतर त्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. मार्केट पोलीस स्थानकात या संबंधित फिर्याद दाखल करण्यात आली असून मुंबईचा डॉन बेळगावात गुंडगिरी करत असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. त्यामुळे याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.