सैन्यात भरती होण्याची स्वप्ने अनेक युवक पाहत असतात तर कांही पालकांना आपल्या मुलाने लष्करात भरती व्हावे अशी इच्छा असते. याचा फायदा घेऊन सध्या पात्रता नसलेल्या कांही जणांकडून शहरात मिलिटरी ट्रेनिंग अकॅडमीच्या नांवाखाली आर्थिक लुबाडणूक केली जात असून यापासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या शहरात बोगस मिलिटरी ट्रेनिंग अकॅडमीच्या नांवाखाली मुलांकडून दरमहा 8 ते 10 हजार रुपये उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. लष्करात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या युवा पिढीसाठी गेल्या कांही वर्षापासून कांही मोजक्या नामांकित मिलिटरी ट्रेनिंग अकॅडमी बेळगाव शहरात कार्यरत आहेत.
या ॲडमींकडून युवकांना योग्य प्रकारे प्रशिक्षण आणि आणि मार्गदर्शन करून सैन्य भरतीसाठी सुसज्ज केले जात आहे. या अकॅडमींमधून तयार झालेले अनेक युवक सध्या लष्करात कार्यरत आहेत. तथापि अलीकडे लष्करात भरती होण्याचे युवकांमधील वेड मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे याचा गैरफायदा कांही लोकांकडून घेतला जात आहे.
बेळगांवात गेल्या कांही महिन्यांपासून कांही बोगस मिलिटरी ट्रेनिंग अकॅडमी सुरू झाल्या आहेत. या अकॅडमींतर्फे फक्त सकाळच्या सत्रातील शारीरिक प्रशिक्षणा करता मुलांकडून 5 ते 8 हजार रुपये महिन्याला उकळले जात आहेत. त्याचप्रमाणे डायट अर्थात पोषक आहाराकरिता मुलांकडून दरमहा 2 हजार रुपये जास्तीचे घेतले जात आहेत. या पद्धतीने भारतीय सैनिकांमध्ये स्वप्न उराशी बाळगलेल्या युवकांना सैन्यात जाण्याअगोदरच 50 ते 70 हजार रुपये चा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र नसणाऱ्या अथवा पात्रता नसणाऱ्या लोकांकडून हे प्रकार केले जात असल्याचे समजते. तेंव्हा सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांनी तसेच त्यांच्या पालकांनी अधिकृत परवाना नसलेल्या अशा अकॅडमीपासून सावध रहावे, असे आवाहन जागरूक नागरिकांनी केले आहे.