हार्डवेअर सॉफ्टवेअर इंटरफेस या विषयातील एक्सेलेरा स्टॅंडर्ड्स पीएसएस ही जागतिक मानके (वर्ल्ड स्टॅंडर्ड्स) विकसित करण्यातील पुढाकाराबद्दल बेळगांव येथे मुख्यालय असलेल्या वायव्या लॅब्स कंपनीच्या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
बेळगाव येथे मुख्यालय असलेल्या वायव्या लॅब्स कंपनीचे कार्यालय बेंगलोर येथे देखील असून अमेरिका जपान व युरोपमध्ये कंपनीचा व्यापार पसरला आहे. गेल्या कांही दिवसात सेमीकंडक्टर्स व सिस्टिम्स क्षेत्रात या कंपनीने दिलेल्या योगदानाबद्दल कंपनी चांगलीच चर्चेत आली आहे. गेल्या 14 वर्षात या कंपनीने सेमीकंडक्टर्स ऑटोमोटिव्ह व कम्युनिकेशन क्षेत्रात एम्बेडेड सॉफ्टवेअरबाबत आपले कसब वापरून अतुलनीय कामगिरी केली आहे. हे एम्बेडेड सॉफ्टवेअर व सॉफ्टवेअर ऑटोमेशन सारख्या शोधाबाबत वायव्या लॅब्स कंपनीपाशी 11 अमेरिकन पेटंट आहेत हे विशेष होय.
वायव्य लॅब्सच्या टीमने आता एक नवा इतिहास रचला आहे. हार्डवेअर सॉफ्टवेअर इंटरफेस या विषयातील एक्सेलेरा स्टॅंडर्ड्स पीएसएस ही जागतिक मानके (वर्ल्ड स्टॅंडर्ड्स) विकसित करण्यात वायव्या लॅब्सच्या टीमने पुढाकार घेतला आहे. एवढेच नव्हे तर त्यात मोठा हातभार लावला आहे. नुकतेच या तंत्रज्ञानाला जागतिक मानके स्टॅंडर्ड म्हणून मान्यता मिळाली आहे. कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ कार्तिक गुरुराज यांनी डी व्ही काॅन या जागतिक संमेलनात कंपनीचे प्रतिनिधित्व करत यासंबंधी माहिती पुरवली. दरवर्षी वेगवेगळ्या देशात होणारे हे संमेलन यंदा भारतातून ऑनलाईन माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात पीएसएस ही जागतिक मानके म्हणून मान्यता प्राप्त ठरले आहेत.
पीएसएस मानके या नव्या तंत्रज्ञानामुळे हार्डवेअर सारखेच उपयुक्त तंत्रज्ञान म्हणजे पोर्टेबल स्टिम्युलस स्टॅंडर्ड याचा वापर जगात कोणीही आपल्या नव्या विकसित सॉफ्टवेअरची चांचणी करण्यासाठी करू शकतो. त्यामुळे एखादे नवे सॉफ्टवेअर आल्यावर हार्डवेअरची निर्मिती होईपर्यंत वाट पहावी लागणार नाही.
वायव्या लॅब्सने या आधीच ओपन एचएसआय हे क्रांतिकारी तंत्रज्ञान यासाठी उपलब्ध करून दिले आहे. पीएसएस मानके तयार करण्यासाठी वायव्य लॅबच्या तंत्रज्ञांनी गेली 5 वर्षे मेहनत घेतली आहे. या तंत्रज्ञांमध्ये हे कार्तिक गुरुराज यांच्यासह उमा बाली, उमा बोनदाडा, अंजना होसूर, अश्विनी नाईक, वेणूगोपाल कोलथुर, संतोष मायकेल, श्रीनिवास नागरेड्डी व संदीप पेंढारकर यांचा समावेश आहे. उपरोक्त कामगिरीबद्दल या सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे