अलीकडच्या काळात ग्रेट ब्रिटन येथून बेळगांव जिल्ह्यात परतलेल्या 15 जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून ते सर्वजण कोरोना निगेटिव्ह आढळून आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज दिली.
ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी बरोबरच कोरोनासंदर्भात पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ पुढे म्हणाले की, अलीकडच्या काळात बेळगांव जिल्ह्यात ब्रिटन येथून 15 जण परतले आहेत. एसओपीनुसार या सर्वांचे स्वॅबचे नमुने घेऊन प्रयोगशाळेला धाडण्यात आले होते. त्यांचा अहवाल आला असून संबंधित 15 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर 15 जणांपैकी 10 जण बेळगांव शहरातील असून 5 जण जिल्ह्याच्या अन्य भागातील आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्याचप्रमाणे ब्रिटनहून आलेल्या या सर्वांना स्वतःच्या आरोग्याची अतिरिक्त जादा काळजी घेण्याची सूचना आरोग्य खात्याने दिली असून कोरोनाचे लक्षण आढळल्यास तात्काळ संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्पष्ट केले.