मराठी भाषिक जनतेच्या पाठिंब्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीने 1956 पासून सीमालढा जिवंत ठेवला असून मराठी भाषिकांच्या ताकदीवर आतापर्यंत अनेक निवडणुकीत विजय मिळविला आहे. त्याप्रमाणे येत्या ग्रामपंचायत निवडणुकीतही प्रत्येक पंचायतीवर भगवा फडकवण्याची संधी मराठी भाषिकांनी दवडू नये, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून महाराष्ट्र एकीकरण समितीने या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून माहिती घेतली जात आहे. तसेच आवश्यक ते मार्गदर्शन केले जात आहे. म. ए. समितीतर्फे ग्रामपंचायत किंवा इतर कोणतीही सार्वजनिक निवडणूक सीमा लढ्याचा एक भाग म्हणून लढविले जाते हे लक्षात घेऊन मराठी भाषिकांनी अत्यंत कटाक्षाने आपल्या उमेदवारांना मतदान करणे आवश्यक आहे, असे सांगून समितीने कधीही जातीपातीचे राजकारण केलेले नसून सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्रात सामील होणे हे एकच ध्येय बाळगले आहे, असे दीपक दळवी यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय पक्ष वेगवेगळ्या प्रकारे मराठी भाषिकांत फूट पाडण्याचे काम करत असतात. मात्र मराठी भाषिकांनी फूट पाडणाऱ्यापासून दूर राहात पंचायतीवर समितीची सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सीमाप्रश्नाच्या प्रदीर्घ लढ्यात समितीने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मात्र मराठी लोकांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर हा लढा आजही कायम असून या निवडणुकीतही समितीला घवघवीत यश मिळेल असा विश्वास आहे. तथापि कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे म. ए. समिती जो आदेश देईल त्याला प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त पंचायतींवर भगवा फडकविण्यात सज्ज व्हा आणि मराठी बाणा दाखवून द्या, असे आवाहन शेवटी दीपक दळवी यांनी केले.