बेेेळगाव शहर उपनगरातील मोठ्या वृक्षांची कत्तल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि निसर्गप्रेमी दिपक अवर्सेकर यांनी आक्रमक पवित्रा घेऊन झाडाला मिठी मारून बसण्याचा इशारा दिल्यामुळे एका मोठ्या झाडाला जिवदान मिळाल्याची घटना आज सकाळी चिदंबरनगर येथे घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, भाग्यनगर 4 था क्रॉस येथील एक मोठे झाड तोडण्यात येत असल्याची माहिती आज सकाळी आसपासच्या नागरिकांनी दीपक अवर्सेकर यांना दिली. तेंव्हा अवर्सेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तसेच झाड तोडणार यांना जाब विचारून वृक्षतोड त्वरित थांबविण्याचा सांगितले. त्याचप्रमाणे काम थांबविले नाही तर मी स्वतः झाडाला मिठी मारून बसेन आणि माझ्या सहकार्यांनाही बोलावीन, असा इशारा दीपक अवर्सेकर यांनी झाड तोडणाऱ्यांना दिला.
परिणाम हबकलेल्या लाकूडतोड्यांनी झाड तोडण्याचे काम त्वरित थांबविले. विद्युत वाहिन्यांना अडथळा करणाऱ्या झाडाच्या फांद्या अवश्य तोडा मात्र त्यासाठी संपूर्ण झाड तोडू दिले जाणार नाही, अशी तंबी यावेळी दीपक अवर्सेकर यांनी दिली.
सध्या शहर उपनगरात सुरू असलेल्या वृक्षांच्या कत्तलीचा विरोधात सामाजिक कार्यकर्ते व निसर्गप्रेमी दीपक अवर्सेकर यांनी जोरदार आवाज उठविला आहे. त्याचप्रमाणे कालच त्यांनी मोठी झाडे तोडण्याचा प्रकार निदर्शनास येतात नागरिकांनी आपल्याशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन देखील यांनी केले आहे.
या आवाहनाला आज सकाळी भाग्यनगर 4 था क्रॉस येथून प्रतिसाद मिळून आपण एका झाडाला जीवदान देण्यात यशस्वी झाल्याबद्दल अवर्सेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. भाग्यनगर 4 था क्रॉस येथील नागरिक आणि निसर्गप्रेमींमध्ये देखील दीपक अवर्सेकर यांच्या उपरोक्त भूमिकेची प्रशंसा होत आहे.