वाहनाच्या कालबाह्य कागदपत्रांची वैधता वाढविण्याच्या कामकाजासाठी केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने ३१ मार्चपर्यंतची वाढीव मुदत दिली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट, रजिस्ट्रेशन सारख्या कागदपत्रांसाठी हि मुदत वाढ देण्यात आली आहे. तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या आदेशाची अंमलबजावणी करण्यासही सुचविले आहे.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट, रजिस्ट्रेशन संदर्भातील कागदपत्रांची वैधता वाढविण्यासाठी ही वाढीव मुदत जाहीर केली आहे. यासंबंधित आदेशाचे परिपत्रक आज केंद्रीय मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठविले आहे.
यापूर्वीही केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने ३० मार्च २०२०, ९ जून २०२० आणि २४ ऑगष्ट २०२० रोजी मोटर व्हेईकल १९८८, आणि केंद्रीय मोटार व्हेईकल नियम १९८९ नुसार कागदपत्रांची वैधता वाढविण्यासंदर्भात परिपत्रक जारी केले होते. फिटनेस, परमिट, लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि यासंबंधित सर्व कागदपत्रांची वैधता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यासाठी परिपत्रक जाहीर केले होते. कोविड रुग्णांची संख्या जरी घटत असली तरी कोविड चा धोका अजून टळला नाही. यासाठी कोविड संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा ही मुदत वाढवून देण्यात आली असून नव्या परिपत्रकानुसार ३१ मार्चपर्यंत कागदपत्रे वैध असणार आहेत.
ज्या कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी २०२० रोजीपर्यंत कालबाह्य होईल किंवा ३१ मार्च २०२० पर्यंत कालबाह्य होईल अशा कागदपत्रांसाठी वरील वाढीव मुदत लागू होणार आहे. या नव्या परिपत्रकातील आदेशामुळे वाहनधारकांना प्रवासादरम्यान होणार कागद्पत्रासंबंधित त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.