ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोरदार लढाई होणार आहे.
मोठ्या प्रमाणात स्पर्धक या निवडणूक रिंगणात उतरले असून बेळगाव तालुक्यात होणाऱ्या निवडणुकीत निवडणूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, यासंबंधी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी तालुक्यातील केंद्रात प्रशिक्षण शिबिराचे शुक्रवार दि. १८ डिसेम्बर रोजी आयोजन करण्यात आले होते.
निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले. निवडणुकीसंदर्भात कोणत्याही प्रकारची शंका असल्यास कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून शंकांचे निरसन करून घ्यावे, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी, बेळगाव, हुक्केरी आणि खानापूर तालुक्यातील प्रशिक्षण केंद्रांना भेटी देऊन प्रशिक्षण देणाऱ्या अधिकारी आणि सहायक अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. तसेच मस्टरींग आणि डिमस्टरींग च्या तयारीबाबत पाहणी केली.
यावेळी बेळगाव केंद्राला भेट देताना पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, खानापूर तालुक्यातील केंद्राला पोलीस वरिष्ठाधिकारी लक्ष्मण निंबरगी, आणि हुक्केरी केंद्राला भेट देताना वरिष्ठ जिल्हा पोलीस अधिकारी अमरनाथ रेड्डी, उपविभागाधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.