रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करायचे असल्यास जनतेने रस्ते आणि वाहतुकीचे नियम पाळावेत तसेच याबद्दल जनजागृती होणे अत्यावश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी व्यक्त केले.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, कन्नड जानपद शिक्षण संस्था आणि उत्सव रॉक गार्डन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. २१ डिसेंबर रोजी चन्नम्मा सर्कल येथे रस्ते सुरक्षा जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आज हिरवे निशाण दाखवून चालना देण्यात आली.
सदर कार्यक्रम ७ दिवस चालणार असून जनतेमध्ये रहदारी आणि वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतरही जनतेमध्ये निरंतर जागृती करण्यात येणार आहे. वाहन चालविताना हेल्मेट वापरणे अनिवार्य असून रस्ते वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर अजूनही प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक असून वाहन चालविताना मास्कचा वापर करणेही आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले.
यावेळी भित्तिपत्रकाचेही अनावरण करण्यात आले. वाहनावर आणि शहर परिसरात जागृतीसाठी या पत्रकांचा वापर करण्यात येणार आहे. यावेळी जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. ही फेरी चन्नम्मा सर्कलपासून सुरु होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य रस्त्यावरून क्रांतिवीर संगोळी रायन्ना सर्कल येथे पोहोचली.
या कार्यक्रमाला डीसीपी चंद्रशेखर नीलगार, केएसआरपी कमांडंट हंजा हुसेन, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपनिर्देशक गुरुनाथ कडबूर, कार्यक्रमाचे संयोजक प्रदीप मेलगडे, प्रादेशिक वाहतूक अधिकारी शिवानंद मगदूम, कन्नड जानपद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वेदाराणी दासनूर, प्रकाश भट, चालक समिती, ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक आणि केएसआरपी कर्मचारी उपस्थित होते.