संपूर्ण बेळगाव शहरात सुरु असलेल्या विकासकामांमुळे सुविधांपेक्षा असुविधांचीच संख्या अधिक होत आहे. मध्यवर्ती बसस्थानकावर रस्त्याचे कामकाज गेले कित्येक महिने सुरु आहे. या परिसरात वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढत चालले असून याचा फटका आता जनतेला सहन करावा लागत आहे. शुक्रवारपासून सुरु असलेला परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटला; मात्र आता रहदारीचा प्रश्न कधी सुटणार? या प्रश्नाचे उत्तर जनता प्रशासनाकडे मागत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकासमोर सुरु असलेले रस्त्याच्या डागडुजीचे काम गेले कित्येक महिने रखडले आहे. यामुळे या मार्गावरील रहदारी पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. परंतु शहर परिसरात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.
परंतु स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेली विकासकामे ही रखडलेल्या अवस्थेतच आहेत. याचाच परिणाम म्हणून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार वाढत आहेत. मध्यवर्ती बसस्थानकासमोर सातत्याने वाहतूक कोंडीचा प्रकार होत आहे. या मार्गावर होत असलेली ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने नवे नियम बनविणे महत्वाचे आहे.
बेळगावमधील नागरिक हे रहदारीच्या बाबतीत आधीच बेजबाबदार आहेत. वाहतुकीचे नियम पाळण्यात अनेक नागरिक बेशिस्तपणा दाखवतात. यासोबतच रहदारी पोलीस विभागातर्फे हेल्मेटसक्तीसह अनेक वाहतुकीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते.
आंतरराज्य बसेस हे मुख्य डेपोमध्ये म्हणजे आता आहेत ते डेपो वळविण्यात यावे यासोबतच शहरातील बस वाहतूक ही शिवाजीनगर डेपोत वळवण्यात आली तर स्थानिक नागरिकांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकेल. यासोबतच रहदारी पोलिसांची होत असलेली तारंबळही वाचेल.
मध्यवर्ती बसस्थानक वगळता विकासकामांतर्गत होत असलेल्या कामामुळे अनेक ठिकाणची वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. यामुळे शहरात बाजारपेठेला जोडल्या जाणाऱ्या मार्गांसहित अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रकार घडत आहे.
या साऱ्यांमध्ये जनता तर भरडली जात आहेच, शिवाय रहदारी पोलिसांचीही नाहक तारांबळ उडत आहे. ज्या पद्धतीने रहदारी पोलीस विभाग नियमांची काटेकोर अंमलबजावणी करते त्याचप्रमाणे अशा असुविधांबाबतही लक्ष पुरवून या समस्या सोडविण्यात भर द्यावा, ही एकच अपेक्षा नागरिक करत आहेत.