मुतगे (ता. बेळगांव) येथील श्री महालक्ष्मी मंदिरांमध्ये चोरी करून चोरट्यांनी दानपेटीतील रोख रकमेसह देवीच्या अंगावरील 50 तोळे चांदीचे आणि 5 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार आज गुरुवारी सकाळी उघडकीस आला.
मुतगे (ता. बेळगांव) गावचे आराध्य दैवत असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिराच्या दरवाजाला आणि शटर लावलेली तीन कुलपे तोडून काल रात्री चोरट्यांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी दानपेटी आणि गल्ल्यातील देणगीच्या स्वरूपातील रोकड त्याप्रमाणे देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र सोन्याची कर्णफुले कंबरपट्टा आदी 50 तोळे चांदीचे आणि 5 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करून पोबारा केला. मंदिराचे पुजारी गोविंद सुतार हे आज गुरुवारी सकाळी 7 च्या सुमारास नेहमीप्रमाणे मंदिर उघडण्यास गेले असता चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
चोरीच्या या घटनेची माहिती सुतार यांनी तात्काळ देवस्थान कमिटीच्या सदस्यांना दिली. तेंव्हा उमेश पुरी, भाऊ पाटील, हेमंत पाटील, बाळू बिरादार, शामराव पाटील, शिवाजी कणबरकर, पिंटू पुजेरी, राजू कणबरकर आदींनी त्वरित मंदिराकडे धाव घेतली.
तसेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील मंदिरांमध्ये हे चोरी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून पोलीस खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.