कोरोना प्रादुर्भाव आणि येत्या 1 जानेवारी 2019 पासून उच्च प्राथमिकसाठी विद्यागम उपक्रमासह सुरु होणारे दहावीचे वर्ग या पार्श्वभूमीवर तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मल्लिकार्जुन कलादगी यांनी आज बेळगांव तालुक्याचा दौरा करून शाळांच्या स्वच्छतागृहांची पाहणी केली.
आजच्या आपल्या पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी बेळगाव तालुक्यातील एकूण आठ शाळांना भेट दिली. या भेटीप्रसंगी त्यांनी शाळेची इमारत, त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या सोयीसुविधा, आदींसह प्रामुख्याने शाळेच्या स्वच्छतागृहांची पाहणी केली.
त्याचप्रमाणे आवश्यक ठिकाणी स्वच्छतागृहांची सुधारणा करण्याची तसेच स्वच्छतागृहांची वेळोवेळी साफ-सफाई करून सॅनिटायझेशन केले जावे, अशी सूचना त्यांनी मुख्याध्यापक आणि शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांना केली. याखेरीज कलादगी यांनी उपस्थितांकडून शाळेच्या समस्या जाणून घेतल्या.
मुलींची मराठी प्राथमिक शाळा भेंडीगेरी, मुलींची उच्च प्राथमिक शाळा भडग खालसा, मुलींची माध्यमिक शाळा अरळीकट्टी, मुलींची उच्च प्राथमिक शाळा हिरेबागेवाडी,
मुलींची उच्च प्राथमिक शाळा तारिहाळ, मुलींची उच्च प्राथमिक शाळा चंदनहोसुर, मुलींची उच्च प्राथमिक शाळा मास्तमरडी आणि मुलींची उच्च प्राथमिक शाळा के. के. कोप्प या शाळांना आज तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा सुधारणा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.