राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनीती आखण्यासंदर्भात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
रेल्वे ओव्हर ब्रिज येथील मराठा मंदिर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना बेळगांव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले कि, आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात प्रत्येक गांवामध्ये वार्ड निहाय कमिटी नेमून उमेदवार निवडण्याबरोबरच त्याला बहुमताने विजयी करून प्रत्येक ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्याचा निश्चय आपण सर्वांनी करायचा आहे.
यावेळी व्यासपीठावर चिटणीस एल. आय. पाटील, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील व माधुरी हेगडे आदी उपस्थित होते. येत्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्येक गावातील वॉर्डांमध्ये समितीचा उमेदवार उभा करून निवडणूक जिंकण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या अनुषंगाने उमेदवार निवडीसाठी गाव पातळीवर वॉर्डनिहाय निवड समिती स्थापण्याची सूचना करून निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने सर्वांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहनमनोहर किणेकर यांनी केले.
या बैठकीत बोलताना जि. पं. सदस्या सरस्वती पाटील म्हणाल्या, माय मराठीसाठी कोणत्याही परिस्थितीत आपण ही निवडणूक जिंकली पाहिजे. प्रत्येक ग्रामपंचायतीवर समितीचा भगवा ध्वज फडकला पाहिजे, यासाठी प्रत्येकाने जोमाने कामाला लागून समितीचे वर्चस्व गावोगावी प्रस्थापित करण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजे, आणि पुन्हा एकदा आपण सज्ज झाले पाहिजे.
यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने संतोष मंडलिक, मनोहर संताजी, कृष्णा हुंदरे, ॲड. सुधीर चव्हाण, बी. डी. मोहनगेकर, एपीएमसी सदस्य आर. के. पाटील, अरुण कानूरकर, ॲड. एम. जी. पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची कागदपत्रे कन्नड भाषेत छापण्यात आली आहेत. यामुळे मराठी भाषिकांची गैरसोय होत आहे. यासाठी मराठीमध्ये कागदपत्रे पुरविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती इच्छुक उमेदवारांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वकील मंडळींची व्यवस्था करण्याचे ठरविण्यात आले. बेळगांव तालुका म. ए. समिती कार्यालयामध्ये येत्या सोमवारपासून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ही वकील मंडळी त्यांना नेमून दिलेल्या कामासाठी उपलब्ध असणार आहेत. याची नोंद घेऊन इच्छुक उमेदवारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
ग्रामपंचायत निवडणुकीसह शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात येत्या 8 डिसेंबर रोजी देशव्यापी आंदोलन छेडले जाणार आहे. या आंदोलनाला आजच्या बैठकीत पाठिंबा दर्शविण्यात आला. या बैठकीला तालुक्यातील समितीच्या पदाधिकारी व सदस्यांसह बहुसंख्य कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते.