बेळगांव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यंदादेखील मराठी भाषिकांचा वरचष्मा दिसून आला. नेहमीप्रमाणे या वेळी राजकीय पक्षांनी आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला. परंतु तालुक्यातील समस्त मराठी भाषिक मतदारांनी आपली एकजुटीची ताकद दाखविल्यामुळे मराठी उमेदवारांनी निर्विवाद बाजी मारली. विशेष म्हणजे नेत्यांनी मेहनत न करता मराठी भाषिक बहुसंख्येने विजयी झाले.
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हे मराठी भाषिकांचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले. इतर पक्षात गेलेली उमेदवार देखील मराठी भाषिक असल्यामुळे यावेळी तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर मराठी भाषिकांचा वरचष्मा पाहायला मिळाला. सध्या सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल असून महाराष्ट्रात सामील होण्याची आपली मागणी न्यायाची असल्याचे मराठी भाषिक मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. यावेळी बेळगांवच नव्हे तर खानापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर मराठी भाषिकांचा भगवा ध्वज फडकला आहे. मराठी भाषिक मतदारांनी एकजुटीने सूत्रे हातात घेऊन मतदान केल्यामुळे यावेळी मराठी नेतेमंडळींना देखील मेहनत घ्यावी लागली नाही.
ग्रामपंचायत निवडणूक कोणत्याही पक्षाच्या झेंड्याखाली किंवा पुरस्कृतरीत्या लढविता येत नाही. मात्र निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रीय पक्षांचा छुपा पाठिंबा हा असतोच. यावेळी झालेल्या या निवडणुकीत बेळगांव तालुक्यात राष्ट्रीय पक्षांना दणका देत मराठी भाषिकांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. येळ्ळूर, बेनकनहळ्ळी, मुचंडी, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक अशा बहुतांश ग्रामपंचायतीवर मराठी भाषिकांनी वरचष्मा मिळविला आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांनी आपली ताकद अजमावताना बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपले उमेदवार उभे केले होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात मराठी भाषिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता मराठी उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केले आहे.
परिणामी संबंधित पक्षांचा मोठा अपेक्षाभंग झाला. कांही ठिकाणी राजकीय पक्षाचे उमेदवार विजयी झाले असले तरी ते मराठी भाषिक असल्यामुळे मराठीसाठी एकजूट करण्याच्या तयारीत आहेत. एकंदर बेळगांव तालुक्यातील ग्रामपंचायतींवर मराठी भाषिकांनी आपले वर्चस्व असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आगामी सर्वच निवडणुकांमध्ये एकजुटीने राहून मराठी भाषिकांनी सडेतोड उत्तर देणे ही काळाची गरज बनली आहे.