कोरोनामुळे आगामी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा लांबणीवर पडणार असल्याचे संकेत कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी सोमवारी दिले. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा नेहमीप्रमाणे मार्चमध्ये घेण्यात येणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
बेंगलोर येथे एका कन्नड वृत्तवाहिनीशी बोलताना शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी एसएसएलसी आणि पीयू द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, तसेच शैक्षणिक वर्षाच्या कार्यक्रमाचे तपशीलवार कॅलेंडर देखील कांही दिवसात बाहेर पडेल, अशी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी परीक्षेची चिंता करण्याची गरज नाही.
या वर्षाच्या उपलब्ध शैक्षणिक दिवसांची संख्या लक्षात घेऊन अभ्यासक्रम कमी होईल याची खातरजमा केली जाईल. विभाग अधिकारी, शाळा आणि शिक्षक संघटनांशी सल्लामसलत केल्यानंतर वेळापत्रक निश्चित केले जाईल, असेही शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार म्हणाले.
येत्या 1 जानेवारीपासून दहावी आणि बारावीच्या वर्गासह विद्यागम योजना सुरू करण्यात येणार आहे. दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांवर कोणताही ताण पडू नये अशा पद्धतीने अभ्यासक्रमात कपात करून आठवड्याभरात अभ्यासक्रम जाहीर करण्यात येणार आहे. 2020 च्या दहावी परीक्षेवेळी परीक्षा केंद्रामध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ज्या पद्धतीने पावले उचलली होती, त्याच पद्धतीने आता शाळांपासून देखील कोरोनाला दूर ठेवण्यासाठी उपाय योजना आखण्यात येत आहे.
दहावी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने खबरदारी घेतली होती, ती संपूर्ण राज्याला आदर्श ठरली होती. त्याच पद्धतीने आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी खबरदारी घेऊन कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असेही मंत्री एस. सुरेशकुमार यांनी सांगितले.