सरकारी कामाचे तीनतेरा वाजलेले आपण नेहमीच पाहतो. परंतु अनेक ठिकाणी सरकारी कामांमुळे फज्जा उडालेला आपल्याला पहायला मिळतो. बेळगावमधील मुतगा गावात सरकारी कामाचा असाच गोंधळ आपल्याला पहायला मिळतो.
सांबरा मार्गावरून जाताना मुतगा गावाची हद्द सुरु होते. या गावच्या हद्दीत महामार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. या फलकावर या गावच्या लोकसंख्येची नोंद दाखविण्यात आली आहे. परंतु या गावच्या फलकावर जनसंख्येचे कन्नडमधील ‘ट्रान्सलेशन’ हे विचित्र पद्धतीने झालेले पहायला मिळते. जनसंख्येची माहिती देताना इंग्रजी भाषेत ‘सोल्स’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या गावात नक्की माणसे राहतात की आत्मा राहतात? असा आश्चर्यजनक प्रश्न निर्माण होत आहे.
सरकारी कामाचा गलथानपणा या गोष्टीतून उघड होतो. सांबरा रस्त्यावरून जाताना आपल्याला हा आश्चर्यकारक आणि अद्भुत दिशादर्शक फलक पहायला मिळेल.
बेळगाव – बागलकोट महामार्गावर हा दिशादर्शक फलक बसविण्यात आला असून या फलकावर मुतगा गावच्या लोकसंख्येचे वर्णन करण्यात आले आहे. या गावात तब्बल ७५६१ आत्मा राहतात असा उल्लेख या फलकावर करण्यात आला आहे.
या फलकाबाबत सोशल साईट्सवर पोस्ट व्हायरल होत असून सामान्य जनतेने केलेल्या चुकांसाठी सरकार कारवाईसाठी सरसावते, परंतु अशा पद्धतीच्या सरकारी कामांतील चुकांवर संबंधितांवर कारवाई करण्यासाठी सरकार पुढाकार घेईल का? असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित होते आहे.