शहर परिसरात गरजूंच्या मदतीला धावून जाणाऱ्या संस्थांपैकी एक म्हणजे हेल्प फॉर नीडी हि संस्था. वेळोवेळी प्रत्येक अडलेल्या नडलेल्या गरजू नागरिकांच्या मदतीला हि संस्था नेहमीच धावून जाते.
शहरातील गोगटे सर्कल नजीक आज एका रिक्षा ड्रॉयव्हरच्याही मदतीला हेल्प फॉर नीडी चे सदस्य धावून गेले. परंतु दैवाच्या चक्रासमोर कुणाचेही चालत नाही, याची प्रचिती आज आली.
शहरातील गोगटे सर्कल नजीक श्रीधर यल्लाप्पा शिंगे (वय ५३, रा. ज्योती नगर, कंग्राळी, बेळगाव) हे रिक्षा चालवत होते. रिक्षामध्ये प्रवासीही होते. दरम्यान शिंगे यांच्या पाठीत अचानक वेदना सुरु झाल्याने त्यांनी ताबडतोब रिक्षा थांबविली आणि प्रवाशांना रिक्षातून उतरण्यास सांगितले. त्यानंतर शिंगे यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला.
यावेळी हेल्प फॉर नीडीचे सदस्य गौतम कांबळे घटनास्थळी उपलब्ध होते. त्यांनी तातडीने शिंगे यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु दैवाला हि मदत मान्य नव्हती आणि उपचारादरम्यान श्रीधर शिंगे यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने घोषित केले.
शहरातील अनेक ठिकाणी, अनेक वेळा आणि कित्येक गरजू नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असणाऱ्या हेल्प फॉर नीडी संस्था सदैव तत्पर असते.
परंतु आज घडलेल्या या घटनेमुळे शिंगे यांच्या कुटुंबासह हेल्प फॉर नीडीच्या सर्व सदस्यांवर दुःखाची वेळ आली आहे. आज घडलेल्या घटनेत शिंगे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे रिक्षामध्ये असलेल्या प्रवाशांचा जीव वाचला आहे. परंतु या घटनेत रिक्षाचालकांचा मात्र मृत्यू झाला आहे.