बेळगांव जिल्ह्यातील ग्रामपंचायत रणधुमाळीला प्रारंभ झाला असून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. फेसबुक ओपन करायची फुरसत इलेक्शनला उभे असणाऱ्यांचे “फेस” तुमच्या नजरेस पडतील. व्हाट्सअप, ट्विटर सर्वत्र सध्या या निवडणुकीच्या प्रचाराला ऊत आला आहे. त्याप्रमाणे बार -रेस्टॉरंट ऐवजी शेतातील गाद्यांमध्ये चिकन आणि मटणाच्या रंगीत पार्ट्या झडू लागल्या आहेत. काल सोमवार हा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काल कांही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणुकीपूर्वीच संबंधित उमेदवार विजयी झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी बेळगांव जिल्ह्यात दौरे काढून प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली आहे. एकंदर या वेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा उपयोग केला जात आहे. उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना आपल्याला विजयी करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.