लिंक पाठवण्याद्वारे मोबाईल हॅक करून एका अज्ञात व्यक्तीने खाजगी बाबी उघड करण्याची धमकी देत एका युवकाचा मानसिक छळ करत त्याचे जगणे मुश्कील करून सोडल्याचा प्रकार सध्या शहापूर येथे हे सुरू आहे. सदर अज्ञात हॅकरकडून अनेकांना यापद्धतीने त्रास दिला जात असल्यामुळे त्याचा तात्काळ बंदोबस्त केला जावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, एक अज्ञात इसम लोकांच्या मोबाईलवर निरनिराळी आमिषं दाखवून एक लिंक पाठवीत आहे. सदर लिंक ओपन करताच संबंधित मोबाईलधारकाची संपूर्ण वैयक्तिक माहिती, मोबाईलमधील संपर्क क्रमांक, कॉल रेकॉर्ड, खाजगी छायाचित्रे, व्हिडिओज, मेसेजीस, व्हाट्सअप, फेसबूक, इंस्टाग्राम, आयएमईआय नंबर आदी सर्वकांही त्या अज्ञातांकडून हॅक केले जात आहे. विशेष म्हणजे हॅकिंग केल्यानंतर पैशाची मागणी केली जात नाही. त्याऐवजी हॅक केलेले खाजगी फोटो, व्हिडिओज, दस्तावेज, संभाषण, सोशल मीडियावर अथवा नातलगांमध्ये व्हायरल करण्याची धमकी त्या अज्ञातांकडून दिली जात आहे.
संबंधित अज्ञात व्यक्तीने आपल्या या कृष्णकृत्याद्वारे सध्या शहापूर येथील एका युवकाला वेठीस धरले आहे. खाजगी गोष्टी उघड करण्याच्या धमक्या देऊन सदर युवकाचा मानसिक छळ केला जात आहे. तुझा मोबाईल फक्त नावापुरता तुझ्या हातात आहे, कारण त्याची सर्व सूत्र माझ्या हातात आहेत. मी त्याचा हवा तसा वापर करू शकतो हे लक्षात ठेव, असे हॅकरकडून धमकावले जात आहे. अज्ञाताच्या मानसिक छळाने परिसीमा गाठल्यामुळे त्या युवकाच्या डोक्यात स्वतःचे बरे-वाईट करून घेण्याचे विचार सुरू झाले होते. तथापि त्याच्या मित्राने त्याला सावरून आत्महत्येपासून परावृत्त केले.
अज्ञात हॅकरने शहापूर येथील या युवकाला स्वतःच्या जाळ्यात ओढण्यापूर्वी त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल प्रथम हॅक केला होता. मोबाईल हॅकिंगचे प्रकार मुख्यत्वे करून आर्थिक लुबाडणूकीसाठी केले जात असतात.
परंतु शहापूर परिसरात सुरू असलेला हा प्रकार लक्षात घेता मोबाईल हॅक करणारी व्यक्ती एक तर मनोरुग्ण असावी किंवा हॅकिंगद्वारे मानसिक छळवणूक करून संबंधित मोबाईलधारकांचा गैरकृत्यांसाठी वापर करण्याचा त्या अज्ञाताचा उद्देश असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. तेंव्हा संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लोकांचे मनस्वास्थ्य बिघडवणाऱ्या त्या अज्ञाताचा छडा लावून त्याला कडक शासन करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.