बेळगांव शहरातील स्मार्ट सिटी योजनेची विकास कामे पाच-सहा वर्षे झाली तरी अद्याप संपलेली नाहीत. तथापि या विकासकामांच्या नांवाखाली झाडांची मात्र मोठ्या प्रमाणात कत्तल करून शहराला भकास केले जात आहे. या वृक्षतोडीमुळे शहरातील सुमारे 70 टक्क्याहून अधिक झाडे नाहीशी झाली आहेत. सध्या हिवाळा असला तरी उन्हाळ्यात याचे दुष्परिणाम शहरवासीयांना सहन करावे लागणार आहेत.
बेळगांव शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकासकामे राबविले जात असताना विनाकारण जुन्या वृक्षांची कत्तल केली जात आहे. मंगळवारी चिदंबरनगर येथील एक जुना वृक्ष तोडण्यात आला. स्थानिकांना कोणतीही कल्पना न देता हा वृक्ष तोडून ओंडके ट्रकमधून भरून घेण्यात आले. शहरात असे प्रकार सर्रास घडत आहेत. स्मार्ट सिटीचे कंत्राटदार नागरिकांचा विरोध न जुमानता वृक्षांची कत्तल करत आहेत. परिणामी एकेकाळी वृक्षांनी बहरलेले शहरातील बहुतांश ठिकाणचे रस्ते आता उजाड बनत चालले आहेत.
लष्कराच्या ताब्यात असल्यामुळे कॅन्टोन्मेंट क्षेत्र स्मार्ट सिटीच्या या वृक्षतोडीपासून सुरक्षित आहे. बेळगाव शहरातील 36 टक्के जमीन कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मालकीची असून हा परिसर हिरवाईने नटलेला आहे. क्लब रोडसह कॅन्टोन्मेंट हद्दीतील सर्व रस्ते वृक्षवल्लींनी बहरलेले आहेत. कॅन्टोन्मेंटप्रमाणे टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो परिसर वृक्षवल्लींनी समृद्ध आहे. त्यामुळेच कॅन्टोन्मेंट परिसर आणि व्हॅक्सिन डेपो परिसर ही शुद्ध ऑक्सिजन देणारी बेळगांवची फुफ्फुसे मानली जातात.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरण संरक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. देश नव्हे तर जगभरात बेसुमार वृक्षतोड आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बेळगांव शहरात मात्र स्मार्ट सिटी लिमिटेड करून विनाकारण झाडे तोडली जात आहेत. स्मार्ट सिटीच्या भोंगळ कारभारामुळे स्मार्ट सिटी ऐवजी बेळगांव भकास सिटी होती की काय? याची चिंता नागरिकांना लागली आहे. कारण टिळकवाडी, हिंदवाडीचा कांही भाग, अनगोळ येथील कांही भाग आदी ठराविक परिसर वगळता शहराच्या अन्य भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे.
स्मार्ट सिटीचे कंत्राटदार नागरिकांचा विरोध न जुमानता वृक्षांची कत्तल करत असल्यामुळे स्मार्ट सिटी नेमकी शहरवासीयांसाठी आहे की इतर कोणासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच वृक्षतोडीबद्दल निसर्गप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सध्या ज्या पद्धतीने शहरातील झाडे तोडली जात आहेत ते पाहता याचा बेळगांवच्या पर्यावरणावर निश्चितपणे दुष्परिणाम होणार आहे. सध्या हिवाळा असल्यामुळे कांही जाणवत नसले तरी उन्हाळ्यात तोडण्यात आलेल्या वृक्षांचे महत्त्व कळणार आहे.
दरम्यान, शहरात सर्रास झाडांची विनाकारण तोड होत असल्याची तक्रार सिटीझन्स फोरमचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर यांनी बेळगांवचे मुख्य वनसंरक्षक अधिकारी बसवराज यांच्याकडे केली आहे. बसवराज यांनी यासंदर्भात माहिती घेऊन अकारण वृक्षतोड केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.