गेल्या पंधरा दिवसांपासून औद्योगिक क्षेत्रातील मूलभूत निलेश असणाऱ्या बीड आणि पोलाद यांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या दरांना सरकारने आळा घालावा आणि लॉक डाऊन पूर्वीचे दर किमान वर्षभर स्थिर ठेवावेत, अशी मागणी बेळगांव स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे (बीडीएसएसआयए) करण्यात आली आहे.
बेळगांव स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे अध्यक्ष रोहन जुवळी यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
गेल्या पंधरा दिवसापासून बीड आणि पोलाद यांचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. या दोन गोष्टी औद्योगिक क्षेत्रातील मूलभूत निलेश आहेत. सदर दरवाढीमुळे आधीच संकटात असलेले उद्योजक आणखी अडचणीत आले आहेत. लॉक डाऊनमुळे नुकसानीचा खाईत लोटले गेलेले औद्योगिक क्षेत्र आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तथापि त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. ही वस्तुस्थिती असताना आता बीड आणि पोलाद यांच्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात आश्चर्यकारक वाढ करण्यात येत आहे.
गेल्या 15 दिवसातील ही दरवाढ प्रकर्षाने जाणवणारी आहे. लॉक डाऊन आधी निश्चित केलेल्या दराप्रमाणे उत्पादनाची कामे हाती घेतलेल्या उद्योजकांचे या दरवाढीमुळे मोठे नुकसान होणार आहे. तेंव्हा हा सरकारने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून बीड आणि पोलाद यांची दरवाढ रोखावी. तसेच किमान वर्षभर तरी बीड आणि पोलाद यांची दरवाढ करू नये, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी अध्यक्ष जुवळी यांच्यासह उपाध्यक्ष माधव चौगुले, सेक्रेटरी सुधीर उप्पीन, नितीन लगाडे, प्रभाकर नागरमुन्नोळी आदीसह बेळगांव स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.